वृत्तसंस्था : भारतीय फुटबॉल चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. जगातील महान फुटबॉलपटूंमध्ये गणला जाणारा आणि अर्जेंटिनाला वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार लिओनेल मेस्सी डिसेंबर महिन्यात भारतात दाखल होणार आहे. मेस्सीने स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट करून आपल्या ‘GOAT India Tour’ ची घोषणा केली आणि भारतीय चाहत्यांना आनंदाचा क्षण दिला.
गुरुवार, २ ऑक्टोबर रोजी देशभरात दसऱ्याचा उत्सव साजरा होत असताना मेस्सीने फुटबॉलप्रेमींना खास भेट दिली. आपल्या पोस्टमध्ये त्याने या दौऱ्याविषयी उत्साह व्यक्त केला आणि सांगितले की भारतातील तीन शहरांमध्ये तो विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. मेस्सीने लिहिले, “डिसेंबरमध्ये भारतासारख्या सुंदर देशात येण्याची संधी मिळत असल्याने मी खूप उत्साहित आहे. कोलकाता, मुंबई, दिल्ली आणि कदाचित आणखी एका शहरात कॉन्सर्ट, यूथ फुटबॉल क्लिनिक, पॅडल कप आणि चॅरिटी कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असेल. भारतातील खास लोकांशी आणि सेलिब्रिटींशी भेटण्याचीही मी आतुरतेने वाट पाहतो.” मेस्सी २०११ मध्ये प्रथमच भारतात आला होता. १४ वर्षांनंतर पुन्हा भारतात येत असल्याबद्दल तो म्हणाला – “भारत माझ्यासाठी नेहमीच खास राहिला आहे. येथे घालवलेले क्षण, चाहत्यांची साथ अजूनही आठवते. पुन्हा एकदा त्यांच्यासमोर खेळण्याची आणि भेटण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी सन्मान आहे.”