पुणे : निवडणुकीच्या माध्यमातून ‘जेन झी’ पिढीने प्रथमच पुणे महापालिकेत प्रवेश केला आहे. सहकारनगर पद्मावती प्रभागातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सई थोपटे यांनी विजय मिळवला असून, त्या सर्वांत तरुण नगरसेवक ठरल्या आहेत. केवळ २२ वर्षांच्या असलेल्या सई अद्याप विद्यार्थिदशेत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत राजकीय पातळीवर अनेक प्रतिष्ठेच्या, चुरशीच्या लढतींचा समावेश होता. सहकारनगर, पद्मावती प्रभागात (प्रभाग क्रमांक ३६) सई थोपटे यांच्यासह वीणा घोष, महेश वाबळे, शैलजा भोसले या भाजपच्या अन्य तीन उमेदवारांनीही विजय मिळवला. प्रतिष्ठित महाविद्यालयात बीबीएच्या अंतिम वर्षात सई शिकत आहेत. तसेच, त्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) माध्यमातून विद्यार्थी चळवळीतही कार्यरत आहेत. त्या अभाविपच्या माजी सहसचिव होत्या. सई यांच्या विजयामुळे महापालिकेच्या सभागृहात ‘जेन झी’ला प्रथमच स्थान मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सई यांना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील प्रशांत थोपटे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. विद्यार्थिदशेत असलेल्या सईबरोबरच शिवाजीनगर येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. निवेदिता एकबोटे यांनीही महापालिकेत प्रवेश केला आहे. त्यांनी शिवाजीनगर मॉडेल कॉलनी प्रभागातून भाजपकडून निवडणूक लढवली होती. भारतीय जनता युवा मोर्चाच्या उपाध्यक्ष असलेल्या डॉ. एकबोटे यांनी नुकतीच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची जबाबदारी घेतली आहे. गेली १५ वर्षे त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या मातु:श्री प्रा. ज्योत्स्ना एकबोटे याही नगरसेविका होत्या. वेगवेगळ्या कालखंडात जन्मलेल्या पिढीला नावे दिली जातात. त्यानुसार १९९७ ते २०१२ या कालावधीत जन्मलेल्या पिढीला ‘जेन झी’ म्हटले जाते. जेन झी पिढीतील तरुण दृक् श्राव्य आशयावर (व्हिडिओ कंटेट) भर असलेली, करिअरमध्ये लवचीकता ठेवणारी, नवउद्यमी, मुक्तपणे काम करणारी, मानसिक आरोग्य, समावेशकता याबाबत जागरूक असलेली, पारंपरिक नोकरीपेक्षा अर्थपूर्ण काम करण्यास प्राधान्य देणारी असल्याचे मानले जाते.

