कल्याण : माणकोली उड्डाण पुलाच्या भिवंडी हद्दीत नारपोली पोलीस बुधवारी रात्री गस्त घालत होते. यावेळी काही संशयास्पद वाहनांची तपासणी करत असताना पोलिसांनी दुचाकीवरून सुसाट वेगाने जात असलेल्या दोन तरूणांना रोखले. या तरूणांच्या दुचाकीतील साधन पेटीची (डिकी) तपासणी केली असता, पोलिसांना त्यामध्ये १० हजार ग्रॅम वजनाचा ८४ लाख ४७ हजार रूपये किमतीचा गांजा आढळला. पोलिसांनी तो जप्त केला. दोघांना ताब्यात घेतले.
गांजा तस्कर आता गांजाची नेआण करण्यासाठी दुचाकींचा वापर करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यासाठी रात्रीची वेळ निवडतात हेही पोलिसांना समजले. आकाश रमेश गुप्ता (२४, रा. सुभाषनगर चाळ, हनुमान मंदिर, उल्हासनगर), हर्ष रवी ब्राह्मणे (२६, रा. पंजाबी काॅलनी, सेक्टर तीन, गुरुनानक सोसायटी, उल्हासनगर) अशी गांजा तस्करांची नावे आहेत. नारपोली पोलीस ठाण्याचे हवालदार सचिन जाधव यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करी कायद्याने या दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या आठवड्यात आंध्रप्रदेश, विशाखापट्टणम, महाराष्ट्राच्या विविध भागात गांजाची तस्करी करणाऱ्या १७ जणांच्या एका आंतरराज्य टोळीला कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या पुढाकाराने ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशावरून मोक्का लावला. गांजाची तस्करी सतरा जणांना एकावेळी मोक्का लावण्याची राज्यभरातील ही मोठी घटना आहे.

