पुणे : विमानप्रवास अतिशय किफायतशीर झाला आहे. मात्र, हरितगृह वायू उत्सर्जनाच्या दृष्टीने विमान प्रवास हा पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे. मुंबई-पुणेदरम्यान विमानांची संख्या खूप जास्त असल्याचे अभ्यासातून दिसून आले. मुंबई-पुणे प्रवासासाठी चांगल्या प्रकारे जोडलेले असताना या अंतरासाठी विमानप्रवास करणे हा गुन्हा असल्यासारखे आहे, असे मत ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन’चे माजी अध्यक्ष श्रीकांत वैद्य यांनी मांडले.
प्रदूषण कमी करण्यासाठी ‘सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल’ हा उपाय फारसा परिणामकारक ठरणारा नसून, त्यापेक्षा चीन-जपानच्या धर्तीवर वेगवान रेल्वेसेवा विकसित केल्यास कर्ब उत्सर्जन कमी होईल, असेही त्यांनी नमूद केले. ‘पुणे इंटरनॅशनल सेंटर’तर्फे (पीआयसी) आयोजित ‘जागतिक ऊर्जा क्षेत्रातील अस्थितरता भारतासाठी धोरणात्मक पर्याय’ या विषयावर वैद्य बोलत होते. ‘पीआयसी’चे विश्वस्त लेफ्टनंट जनरल (नि.) विनायक पाटणकर या वेळी उपस्थित होते. वैद्य यांनी कच्च्या तेलाची जागतिक पातळीवरील स्थिती, भारताकडून केली जाणारी तेलाची आयात, ऊर्जा निर्मितीचे अन्य पर्याय अशा मुद्द्यांवर भाष्य केले.

