ठाणे : मुंबईतील मानखुर्दमध्ये फेरीवाल्यांकडील चिकन शोरमा खाल्यामुळे काही जणांना विषबाधा होऊन एक तरुण दगावल्याची घटना नुकतीच घडली. मात्र या घटनेनंतर रस्त्यावर हातगाड्या तसेच, स्टॉल लावून विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उघड्यावरच बिनदिक्कतपणे खाद्यपदार्थ तयार केले जात असून काही ठिकाणी खूपच अस्वच्छ वातावरण असते. अन्नविक्रेते, व्यावसायिक अन्नसुरक्षेचे नियम पायदळी तुडवत असूनही या व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारण्याकडे अन्न आणि औषध प्रशासनाकडून (एफडीए) दुर्लक्ष होत आहे. विक्रेत्यांची नियमित झाडाझडती होत नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी एफडीएचे सहायक आयुक्त आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्यामुळे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतील एफडीएचे कामकाज पूर्णपणे थंडावले आहे. गल्लोगल्ली खाद्यपदार्थ विक्रीचे स्टॉल सर्रास दिसून येतात. मुख्य रस्त्यावरही बेकायदा स्टॉल आणि हातगाड्यांनी अतिक्रमण केले असून या हातगाड्यांवरून विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची विक्री होते. नागरिकही अशा ठिकाणी खाद्यपदार्थ खाण्यासाठी गर्दी करतात.
लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत प्रत्येकजण उघड्यावरील खाद्यपदार्थावर ताव मारतात. मात्र हे व्यावसायिक अन्नसुरक्षेच्या नियमांना तिलांजली देत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्नपदार्थ तळण्यासाठी वारंवार खाद्यतेलाचा पुनर्वापर केला जातो. त्यामुळे आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात, तेथील वातावरण खूपच अस्वच्छ असते. गंभीर बाब म्हणजे, शहरातील विनापरवाना खाद्यपदार्थविक्रेत्यांची संख्या मोठी आहे. खाद्यपदार्थ बनवणारे आणि हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. अशा प्रकारे अन्नविक्रेते, व्यावसायिक नियमभंग करत आहेत. या हातगाड्यांवरून कमी दर्जाचे आणि भेसळयुक्त पदार्थांची विक्री होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. परिणामी, नागरिकांचे आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे एफडीएने नियमितपणे या व्यावसायिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र मनुष्यबळ कमी असल्याचे कारण देत प्रत्येक व्यावसायिकाची तपासणी करणे शक्य नसल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अन्नपदार्थांचे जास्तीत जास्त नमुने घेऊन त्य़ाची तपासणी करणे गरजेचे आहे. मात्र, एफडीएचे हे काम अत्यंत संथगतीने चालू आहे. मुंबईतील मानखुर्दमध्ये एका फेरीवाल्याकडील चिकन शोरमा खाल्यामुळे १० ते १५ जणांना विषबाधा होऊन एका १९ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर उघड्यावर विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेनंतर एफडीए प्रशासन जागे होऊन रस्त्यावर खाद्यपदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांसह इतरही अन्न व्यावसायिकांची काटेकोरपणे तपासणी करणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करू लागले आहेत. मानखुर्दच्या घटनेनंतर एफडीएच्या कोकण विभागातील अधिकाऱ्यांनी चिकन शोरमाचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे. ठाण्यातील श्रीनगरमधून शोरमाचे नमुने घेतल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. सर्व सहायक आयुक्तांना तपासणीचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.