कल्याण : मध्य रेल्वेच्या अनेक लोकल डब्यांमधील अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायरी नसल्याने लोकलमधून नोकरी आणि अन्य कामांसाठी प्रवास करणाऱ्या अपंगांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अलीकडे सिग्नल बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे आणि इतर तांत्रिक कारणांमुळे धावत्या लोकल बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. या लोकल रेल्वे स्थानक सोडून फलाट नसलेल्या भागात खोळंबून राहतात. या कालावधीत इतर सामान्य प्रवासी लोकलमधून उड्या मारून पायी प्रवास सुरू करतात. परंतु अपंगांच्या डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने या डब्यातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांना डब्यात अडकून रहावे लागते. गेल्या काही दिवसात लोकल सिग्नल यंत्रणेतील बिघाड, ओव्हरहेड वायर तुटणे, एक्सप्रेसचे इंजिन बंद पडून लोकलचा खोळंबा होण्याचे प्रकार मध्य रेल्वेच्या बदलापूर- कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानक भागात वाढले आहेत. दोन तास लोकल एकाच जागी याप्रकाराने खोळंबून राहतात. या कालावधीत सामान्य प्रवासी लोकलमधून उड्या मारून रेल्वे मार्गातून जवळच्या रेल्वे स्थानकात किंवा रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यावर येऊन रिक्षेने इच्छित स्थळी जातात. परंतु, लोकलच्या अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने मुंबई परिसरात नोकरी, व्यवसाय किंवा अन्य कामांसाठी गेलेले अपंग लोकलमधून रेल्वे मार्गात उतरू शकत नाही. काही अपंगांकडे कुबड्या असतात. काहींना सरकत्या गाडीवरून पुढे सरकता येते. अशा अपंग प्रवाशांचे लोकल बंद पडली की हाल होतात. हे अपंग प्रवासी लोकल डब्यातून उतरण्याची धडपड करतात. पण उतरण्यासाठी लोकल डब्याच्या दरवाजा जवळ असलेली आपत्कालीन पायरी नसल्याने अपंगांची गैरसोय होते.
जोपर्यंत लोकल जागची हालत नाही, तोपर्यंत अपंग प्रवासी डब्यात अडकून पडतात. काही अपंगांजवळ पिण्याचे पाणी किंवा भूक लागली असेल तर खाण्यासाठी जवळ काही नसते. त्यांचे या कालावधीत सर्वाधिक हाल होतात. लोकल बंद पडल्यानंतर अशा अपंग प्रवाशांना काही सामान्य प्रवासी रेल्वे फलाटापर्यंत किंवा रेल्वे मार्गालगतच्या रस्त्यापर्यंत नेऊन तेथून वाहनाने प्रवास करण्यासाठी सहकार्य करू शकतात, असे काही अपंगांनी सांगितले. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने ज्या अपंग डब्यांना आपत्कालीन पायरी नाही तेथे पायरी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी अपंग डब्यातून प्रवास करणाऱ्या अपंग प्रवाशांनी केली आहे. काही अपंग विद्यार्थी, महिला या डब्यात प्रवास करतात. लोकल बंद पडल्या की त्यांचे सर्वाधिक हाल होतात. अपंगांच्या डब्यांना आपत्कालीन पायऱ्या असतात. पण काही डब्यांना नसतील तर त्या बसविण्याची व्यवस्था केली जाईल, असे एका रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले. मध्य रेल्वेच्या काही लोकल्सना अपंगांसाठी राखीव असलेल्या डब्यांना आपत्कालीन पायऱ्या नाहीत. लोकल काही तांत्रिक कारणामुळे बंद पडल्या की इतर सामान्य प्रवासी उड्या मारून रेल्वे मार्गातून निघून जातात. पण अपंग डब्यातील प्रवासी राखीव डब्याला आपत्कालीन पायरी नसल्याने लोकल डब्यात अडकून पडतात. -कल्पेश कोळंबे,अपंग प्रवासी.