वृत्तसंस्था : ‘बिग बॉस’च्या शोमध्ये होणारी भांडणं आणि वाद काही नवीन नाहीत. ‘बिग बॉस’च्या दर आठवड्यात स्पर्धक एकमेकांबरोबर भांडतात आणि या भांडणात ते अनेकदा एकमेकांचा अपमान करतात. एकमेकांबद्दल अपशब्द वापरतात. या सगळ्याची शाळा सलमान दर शनिवार आणि रविवारी ‘वीकेंड का वार’च्या भागात घेतो. चूक केलेल्या स्पर्धकांचे कान टोचतो. अशातच आज होणाऱ्या ‘वीकेंड का वार’च्या भागात सलमान खान फरहाना भट्टची शाळा घेणार आहे. फरहानानं गुरुवारच्या भागात टास्कदरम्यान गौरव खन्नाबद्दल अपमानास्पद टीका केली होती. तसंच तिनं त्याच्या आजवरच्या टेलिव्हिजन क्षेत्रातल्या करिअरवर टिप्पणी केली होती. स्वत:ला टीव्हीचा स्टार समजणाऱ्या गौरवला कोणीच ओळखत नाही असं म्हटलं होतं. यावर सलमान त्याच्या स्टाइलमध्ये फरहानाचा समाचार घेणार आहे.
आज होणाऱ्या ‘वीकेंड का वार’चा प्रोमो समोर आला आहे, ज्यात सलमान फरहानावर ओरडताना दिसत आहे. तिला खडेबोल सुनावत आहे. फरहानाने वापरलेल्या शब्दांमुळे सलमान खान पुन्हा एकदा तिच्यासमोर ‘फरहाना अपशब्द कोश’ नावाची एक खास डिक्शनरी घेऊन येतो. यात फरहानाने शोमध्ये वापरलेले सगळे अपमानास्पद शब्द लिहिलेले आहेत. सलमान स्वतः हे शब्द मोठ्याने वाचून फरहानाला ऐकवतो. सलमान म्हणतो, “फरहाना, तू काय बोललीस माहिती आहे का? ‘बी-ग्रेड लोक’… ‘गंदी नाली का कीडा’… ‘गवार’… हे सगळं तू एका नॅशनल टीव्हीवर बोललीस!” यानंतर सलमाननं फरहानाने टीव्ही इंडस्ट्रीवर केलेल्या टिप्पणीबद्दलही नाराजी व्यक्त करत म्हटलं, “तू म्हणालीस की टीव्ही तुझ्या लेव्हलच्या खाली आहे? टीव्हीची औकात नाही की तू त्यावर दिसावं? मला हे ऐकून लाज वाटली.”

