मुंबई : मुंबईतील झोपडपट्ट्यांवर चढलेल्या अनधिकृत मजल्यांसंदर्भात सरकारने गंभीर दखल घेतली असून, अशा मजल्यांवर कारवाई करण्यासाठी आधी त्या संदर्भातील अहवाल तयार केला जाणार आहे. त्यासाठी एका सनदी अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार असून, पुढील अधिवेशनात त्या संदर्भातील अहवाल मांडला जाईल, असे नगरविकास विभागाचा कार्यभार असलेले मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत जाहीर केले. त्याचप्रमाणे मुंबईतील झोपड्यांचे सॅटेलाइट मॅपिंग करण्याचे आश्वासनही दिले.
मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असून, सरासरी १० ते १५ अनधिकृत झोपड्या उभ्या राहात आहेत. मुंबई महापालिका त्यावर कारवाई करत नसल्याप्रकरणी समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. मानखुर्द भागात झोपड्यांवर तीन-तीन मजले चढवण्यात आले आहेत, पण महापालिकेचे अधिकारी कारवाई करत नसल्याचा मुद्दा भाजपचे आमदार मिहिर कोटेचा यांनी मांडला. तर भाजपचे योगेश सागर यांनी तळमजला आणि पहिला मजला सोडून कारवाई व्हावी, अशी मागणी केली. मुंबईत अनधिकृत बांधकाम करणारी गँग आहे. या गँगने मुंबई पोखरली असल्याचे सांगत यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आशिष शेलार यांनी या लक्षवेधीवर बोलताना केली. तर मुंबईतील भूमाफिया जोपर्यंत तुरुंगात जात नाहीत, तोपर्यंत आपण अनधिकृत बांधकामावर अंकुश आणू शकणार नाही, असा मुद्दा भाजप आमदार सुनील राणे यांनी मांडला.