ठाणे प्रतिनिधी : प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत होणार आहे. ठाणे महानगरपालिका स्वच्छतेबाबत नेहमीच अग्रेसर असून महापालिका आयुक्त सौरभ राव हे देखील सर्वंकष स्वच्छता मोहिम शहरात प्रभावीपणे राबवित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेला उत्सफूर्तपणे प्रतिसाद देवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात स्वच्छता पंधरवडा साजरा होत आहे, यामध्ये सर्व नागरिकांनी देखील हिरीरीने सहभाग घ्यावा असे आवाहन खासदार नरेश म्हस्के यांनी नमूद केले.
प्रतिवर्षी ‘स्वच्छता पंधरवडा’ 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सर्वत्र साजरा केला जातो, या अनुषंगाने स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता ही संकल्पना ठाणे महानगरपालिका राबवित असून या उपक्रमातंर्गत आज ठाणे रेल्वेस्थानक परिसराची स्वच्छता करण्यात आली. खासदार नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत संपूर्ण रेल्वेस्थानक परिसराची सफाई करण्यात आली. यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मनिष जोशी, शंकर पाटोळे, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, माजी नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण, प्रतिभा मढवी, राजेश मढवी यांच्यासह महापालिका अधिकारी कर्मचारी, रेल्वेचे कर्मचारी, विविध महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी तसेच महापालिकेचे सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून ठाणे स्टेशन परिसरात महापालिका, ठाणे रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी एकत्र येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना पुर्णत्वास नेण्याच्या दृष्टीकोनातून संपूर्ण ठाणे स्टेशन परिसराची सफाई केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचा धडा आपल्याला दिला असून त्याचे रुपांतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चळवळीमध्ये केले आहे. त्यामुळे स्वच्छता ही चळवळ न राहता तो प्रत्येकाचा स्वभाव व संस्कार झाला पाहिजे असे आमदार संजय केळकर यांनी नमूद केले.
17 सप्टेंबर ते ऑक्टोबर या स्वच्छता पंधरवड्यानिमित्त स्वच्छता मोहिम ठाणे महापालिकेने हाती घेतली असली तरी वर्षभर ही मोहिम महापालिका सातत्याने राबवित आहे. प्रत्येक आठवड्यात विभागनिहाय सर्वंकष स्वच्छता मोहिम राबवित आहे. या स्वच्छता पंधरवड्याचे निमित्त साधून पंधरा दिवसात 150 उपक्रम विविध ठिकाणी आयोजित केले आहे. स्वच्छतेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा मुख्य हेतू आहे. तसेच तरुण तरुणी, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, जागरुक नागरिक तसेच गृह निर्माण सोसायट्यांमध्ये प्रत्यक्ष पोहचवून ही मोहिम अधिक प्रभावीपणे राबवून भारतसरकारचा संदेश नागरिकांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न महापालिका करीत असल्याचे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले. यावेळी ठाणे रेल्वेस्टेशन परिसर, ठाणे रेल्वेस्थानक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळयाच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तसेच उपस्थित सर्व नागरिकांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.