रायगड : रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरमधील श्रीवर्धन तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दारुच्या नशेत पुण्यातील तीन तरुणांनी एसयुव्ही कारने एका महिलेला चिरडलं. महिलेचा जागेवरच मृत्यू झाला. ज्योती धामणस्कर (वय-34) असे मृत महिलेचं नाव आहे. ज्योती या ममता होम स्टेचे मालक अभि धामणस्कर यांच्या बहीण होत्या. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून दोन जण फरार आहे. सर्व आरोपी पुण्यातील चिंचवड येथील रहिवासी असून त्यात एका नगरसेवकाच्या मुलाचा समावेश असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, रुम न दिल्यावरून झालेल्या वादातून शनिवारी रात्री दीड वाजेच्या जवळपास ही घटना घडली. आरोपी दारुच्या नशेत तर्रर्र होते. ते पुण्याहून श्रीवर्धन येथे पर्यटनासाठी आले होते. रात्री थांबण्यासाठी आरोपी लॉज शोधत होते. तिघे अभि धामणस्कर यांच्या मालकीच्या ममता होम स्टेमध्ये पोहोचले. त्यांनी अभि धामणस्कर यांच्याकडे रात्री थांबण्यासाठी रुम मागितली. मात्र, तिघे दारुच्या नशेत असल्याने अभि धामणस्कर यांनी रुम देण्यास स्पष्ट नकार दिली. दुसरीकडे लॉज शोधू शकता, असा सल्ला दिला. त्यावरून आरोपी आणि धामणस्कर यांच्यात बाचाबाची झाली. इतकंच नाही तर तिन्ही आरोपींनी अभि धामणस्कर यांना मारहाणही केली. त्यानंतर आरोपी त्यांच्या एसयुव्ही कारने पळून जात असताना त्यांनी ज्योती धामणस्कर यांना चिरडलं. ज्योती यांचा जगेवरच मृत्यू झाला.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिलेली माहिती अशी, की पिंपरी चिंचवड येथील काही पर्यटक हरिहरेश्वर येथे रविवारी पहाटे पोहोचले. त्यांनी अभि धामणस्कर यांच्या ममता होम स्टे येथे राहण्यासाठी रुमची विचारपूस केली. मात्र, यावेळी सर्व आरोपी दारुच्या नशेत होते. रुमच्या भाड्यावरून आरोपी आणि अभि धामणस्कर यांच्यात वाद झाला. यानंतर पर्यटकांनी धामणस्कर यांना मारहाण केली. सर्वजण पळून जात असतांना ज्योती यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना गाडीखाली चिरडून हे सर्वजण पसार झाले. आसपासच्या गावकऱ्यांनी यातील एका पर्यटकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. पर्यटकावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.