मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी आणि उपनगरीय लोकलवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने मेट्रो प्रकल्पांना गती देण्याचा निर्णय घेतला आहे. २०२७ हे वर्ष ‘मेट्रो वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा सरकारचा मानस असून, या कालावधीत मुंबई आणि परिसरात किमान ७० किलोमीटर लांबीचे नवीन मेट्रो मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या वॉर रूम आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागांना कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावर्षीच्या अखेरीस सुमारे ३६ किलोमीटर मेट्रो मार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा असताना, कामांचा वेग वाढवून ही क्षमता ५० किलोमीटरपर्यंत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मेट्रो २-ब (डी. एन. नगर–चेंबूर/मंडाले) मार्गावरील जुहू सर्कल येथे गर्डर बसविण्याचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी रविवारी १२ तासांचा विशेष रस्ता ब्लॉक घेण्यात येणार असून, दैनंदिन वाहतुकीवरील परिणाम कमी राहावा यासाठी हा ब्लॉक सुट्टीच्या दिवशीच ठेवण्यात येईल. तसेच मेट्रो ६ (स्वामी समर्थ नगर–विक्रोळी) मार्गावरील जमिनीचे वाद आणि न्यायालयीन प्रक्रिया तातडीने निकाली काढून प्रकल्पाला गती देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
याशिवाय, रस्ते वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिवडी–वरळी उन्नत मार्ग ३१ मे २०२७ पूर्वी पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मार्गामुळे पूर्व आणि पश्चिम मुंबईदरम्यानचा प्रवास अधिक जलद आणि सुलभ होणार आहे. वाकोला जंक्शन आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तंत्रज्ञानाधारित उपाययोजना तातडीने राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मेट्रो आणि रस्ते प्रकल्पांच्या कामांच्या ठिकाणी नागरिकांना पूर्वकल्पना मिळावी यासाठी दिशादर्शक व सुरक्षिततेचे फलक लावले जाणार आहेत. तसेच नवीन रस्ते किंवा मेट्रोच्या प्रवेश-निर्गमन मार्गांचे नियोजन करताना भविष्यात वाहतूक कोंडी निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रकल्पांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या आणि मुदतीत काम पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करत त्यांना थेट काळ्या यादीत टाकण्याचा इशाराही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. सरकारच्या या निर्णयांमुळे मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
