मुंबई : प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळणारे काही बसमार्ग आणि वाढती प्रवासी मागणी असलेले मार्ग लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने ५ ऑक्टोबर २०२६ पासून शहरातील १४ बसमार्गांमध्ये महत्त्वाचे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि प्रभावी बससेवा उपलब्ध करून देण्यासाठी काही मार्गांमध्ये सुधारणा, काही मार्गांचा विस्तार, तर काही मार्गांवरील फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. जिजामाता उद्यान ते मजास आगार दरम्यान धावणारे ए-२२, ए-३५ आणि ए-३९ हे तीन बसमार्ग यापुढे सीप्झ बसस्थानकापर्यंतच मर्यादित राहणार आहेत. तसेच रमाबाई नगर ते विक्रोळी आगारदरम्यान धावणारा ए-३० बसमार्ग रद्द करण्यात येणार असून, त्याऐवजी नवीन मार्ग निश्चित करण्यात आला आहे. हा मार्ग आता रमाबाई नगर–घाटकोपर बसस्थानक–नित्यानंद नगर–श्रेयस सिनेमा जंक्शन–लालबहादूर शास्त्री मार्गे विक्रोळी आगार असा असेल. हाजीअली येथील वत्सलाबाई देसाई चौक ते पंडित पलुस्कर चौक दरम्यानचा ए-६२ मार्ग रद्द करण्यात आला असून, ही सेवा वत्सलाबाई देसाई चौक ते ताडदेव येथील वसंतराव नाईक चौक आणि पुढे विद्याविहार बसस्थानकापर्यंत चालविण्यात येणार आहे. याशिवाय ए-२०० या बसमार्गाचा वडाळा आगारापासून विस्तार करून तो रफी अहमद किडवाई मार्ग, झकेरिया बंदर मार्ग आणि श्रीकांत केशव हडकर मार्गे काळाचौकी येथील श्रावण यशवंते चौकापर्यंत वाढविण्यात येणार आहे.
प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन काही मार्गांवर अतिरिक्त फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. ए-४२ मार्गावर सॅण्डहर्स्ट रेल्वे स्थानक ते गोल देऊळदरम्यान सकाळी ८.३० ते रात्री ९ या वेळेत अतिरिक्त फेऱ्या चालविण्यात येतील. ए-२४५ मार्गावर बोरिवली स्थानक (पश्चिम) ते गणपत पाटील नगरदरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४.३० ते रात्री ९.३० या वेळेत अतिरिक्त सेवा उपलब्ध होईल. तसेच ए-२७६ मार्गावर कांदिवली स्थानक (पश्चिम) ते चारकोप पोलिस स्टेशनदरम्यान सकाळी ७ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. याशिवाय १५३, २२३, २४२, २४९, २६६, ३१२, ४२३ आणि सी-५०५ या सर्वसाधारण बसमार्गांचे वातानुकूलित बससेवेत रूपांतर करण्यात येणार आहे. गुरू तेगबहादूर नगर रेल्वे स्थानक ते समाज मंदिर हॉलदरम्यानचा ए-३१५ मार्ग बदलून तो रावळी कॅम्प, कोकरी आगार, वडाळा रोड रेल्वे स्थानक मार्गे प्रतीक्षानगर आगारापर्यंत वाढविण्यात येणार आहे. घाटकोपर पश्चिम येथून सुटणाऱ्या ए-४१९ आणि ए-४२७ बस आता घाटकोपर आगारातून सुटतील. तर ए-४३३ बस अंधेरी स्थानक पश्चिमऐवजी बर्फीवाला उड्डाणपुलावरून थेट जुहू-विलेपार्ले बसस्थानकापर्यंत धावणार आहे. प्रवाशांचा कमी प्रतिसाद मिळत असल्याने बोरिवली स्थानक पूर्व ते घाटकोपर आगारदरम्यानचा ए-४७१ बसमार्ग रद्द करण्यात आला आहे.
