मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. CSMT स्थानकाच्या पुनर्विकास आणि आधुनिकीकरणाच्या कामासाठी मध्य रेल्वेने १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर केला आहे. या कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने अनेक मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात तसेच अंतिम स्थानकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. रेल्वे लँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (RLDA) मार्फत राबविण्यात येणाऱ्या CSMT पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ आणि स्टेब्लिंग लाईन १५ वर पायाभरणीचे काम करण्यात येणार आहे. हे काम सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्मवरील सर्व रेल्वे वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे CSMT वरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या गाड्या दादर आणि ठाणे स्थानकांपर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
या विशेष ब्लॉकदरम्यान दादर स्थानकावर अंतिम थांबा असणाऱ्या गाड्यांमध्ये ११००२ बल्लारशाह–CSMT नंदीग्राम एक्सप्रेस, १२८१० हावडा–CSMT एक्सप्रेस, १२११२ अमरावती–CSMT एक्सप्रेस, ११०२० भुवनेश्वर–CSMT कोणार्क एक्सप्रेस, २२१२० मडगाव–CSMT तेजस एक्सप्रेस, २२१४४ बिदर–CSMT एक्सप्रेस आणि २२१०८ लातूर–CSMT एक्सप्रेसचा समावेश आहे. तसेच १२१३४ मंगळुरू–CSMT एक्सप्रेस ही गाडी ठाणे स्थानकावरच अंतिम थांबा घेणार आहे. रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, ब्लॉकच्या कालावधीत काही गाड्यांच्या वेळापत्रकात आणि मार्गातही आवश्यक बदल करण्यात येऊ शकतात. त्यामुळे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर, मोबाईल ॲपवर किंवा चौकशी केंद्रावरून अद्ययावत माहिती तपासावी. बदललेल्या टर्मिनल आणि वेळापत्रकामुळे गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केले आहे. CSMT पुनर्विकास प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना अधिक आधुनिक, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.
