नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात SIR (Special Intensive Revision) फॉर्मसंदर्भातील धक्कादायक प्रकार समोर आला असून, एका झेरॉक्स सेंटरवर तब्बल ३४०० SIR फॉर्म आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. हे फॉर्म झेरॉक्स करण्यासाठी आणल्याचा आरोप असून, या प्रकरणी पोलिसांनी सूरज पाटील नावाच्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच अनधिकृतपणे SIR फॉर्म स्वतःजवळ ठेवणे आणि त्यांची झेरॉक्स काढण्याच्या प्रकारात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत पाच बीएलओ (Booth Level Officer) अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खारघरमधील एका झेरॉक्स सेंटरमध्ये हे फॉर्म मोठ्या प्रमाणावर झेरॉक्ससाठी आणण्यात आले होते. हे सर्व फॉर्म एकूण ११ मतदान केंद्रांशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. हा प्रकार एका तरुणाच्या लक्षात आल्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा भांडाफोड झाला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली आणि घटनास्थळी मोठी गर्दी झाली. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दावा केला की, झेरॉक्ससाठी फॉर्म घेऊन आलेला तरुण हा भाजपचा युवा पदाधिकारी आहे. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर धक्काबुक्की व झटापटीत झाले. परिस्थिती तणावपूर्ण होताच खारघर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेत दुकानातील सर्व SIR फॉर्म जप्त करून पोलीस ठाण्यात आणले. मात्र, पोलीस ठाण्यात आणल्यानंतर काही वेळातच संबंधित भाजप पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे. या आरोपांमुळे प्रकरणाला आणखी राजकीय रंग चढला आहे.
या प्रकरणानंतर पोलिसांनी जप्त केलेल्या हजारो SIR फॉर्मची तपासणी सुरू केली असून, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे अधिकृत फॉर्म कोणाकडून मिळाले, त्यांची झेरॉक्स का काढली जात होती आणि त्यामागे नेमका उद्देश काय होता, याचा सखोल तपास सुरू आहे. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकृत कागदपत्रे अनधिकृतरीत्या हाताळली गेल्याच्या संशयामुळे प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान, या घटनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर संबंधित व्हिडिओ शेअर करत भाजपवर निशाणा साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, भाजप कार्यकर्त्याकडून जप्त करण्यात आलेले SIR फॉर्म खारघर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून, SIR मोहीम ही केवळ भाजप समर्थक मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी आणि विरोधी मतदारांना वगळण्यासाठी राबवली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांनी उपरोधिक टीका करत या मोहिमेचे नाव बदलून ‘Special BJP Voter Confirmation (SBVC)’ ठेवावे, असा टोला लगावला. मात्र, या आरोपांबाबत अधिकृत तपास अद्याप सुरू असून, पोलिसांकडून सर्व तांत्रिक पुरावे, संबंधित व्यक्तींची चौकशी आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणामागील सत्य स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

