विरार : भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या रक्षाबंधन सणासाठी बाजारपेठा सजल्या असून यंदा पारंपरिक राख्यांपेक्षा आधुनिक आणि आकर्षक डिझाइनच्या राख्यांना अधिक पसंती मिळताना दिसत आहे. २८ ऑगस्ट रोजी साजऱ्या होणाऱ्या रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या राख्यांचे स्टॉल बाजारात उभारण्यात आले आहेत. दरवर्षीप्रमाणे रंगीबेरंगी रेशमी धागे, नक्षीकाम आणि पारंपरिक डिझाइनच्या राख्या उपलब्ध असल्या तरी यंदा ‘ईव्हिल आय’ आणि ‘मिनिमल’ राख्यांची सर्वाधिक मागणी आहे. विशेषतः तरुणी आणि महिला वर्ग या ट्रेंडी राख्यांकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत. ‘ईव्हिल आय’ हे चिन्ह वाईट नजरेपासून संरक्षण आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्याचे प्रतीक मानले जाते. भारतीय परंपरेतील काळा धागा किंवा दृष्ट लागू नये म्हणून लावल्या जाणाऱ्या काळ्या टिकेच्या संकल्पनेला आधुनिक रूप देत या राख्या तयार करण्यात आल्या आहेत. निळ्या, आकाशी, पांढऱ्या आणि चंदेरी रंगांच्या आकर्षक छटांमध्ये उपलब्ध असलेल्या या राख्या केवळ फॅशनचा भाग नसून भावाच्या रक्षणाचा संदेशही देतात. त्याचबरोबर धातूच्या नाजूक चकत्या, मणी, क्रिस्टल्स आणि साध्या काळ्या किंवा चंदेरी धाग्यांचा वापर करून बनविलेल्या ‘मिनिमल’ राख्याही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. साधेपणा, आकर्षक डिझाइन आणि दीर्घकाळ वापरता येण्याची सुविधा यामुळे या राख्यांची लोकप्रियता वाढत असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
ग्राहकांच्या मते, पारंपरिक राख्या सणानंतर कपाटात किंवा देव्हाऱ्यात ठेवून दिल्या जातात, मात्र ‘मिनिमल’ आणि ‘ईव्हिल आय’ राख्या ब्रेसलेटसारख्या दिसत असल्याने भाऊ त्या रोजच्या वापरात, कार्यालयात किंवा महाविद्यालयातही सहज घालू शकतात. त्यामुळे या राख्या केवळ सणापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर फॅशन अॅक्सेसरी म्हणूनही वापरल्या जातात. विद्या नाईक यांनी सांगितले की, आधुनिक डिझाइनमुळे या राख्या तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय ठरत आहेत. तर स्वाती मिश्रा यांच्या मते, यंदा १० रुपयांपासून १०० रुपयांपर्यंत विविध किमतींमध्ये राख्या उपलब्ध असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत अधिक नाजूक आणि आकर्षक डिझाइनचे पर्याय बाजारात आले आहेत. दरम्यान, समाजमाध्यमे आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचाही या नव्या ट्रेंडवर मोठा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विविध प्रकारच्या ट्रेंडी राख्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, ऑनलाइन उपलब्ध असलेल्या राख्यांच्या तुलनेत स्थानिक बाजारातील दर कमी असल्याने अनेक महिला आणि महाविद्यालयीन तरुणी ऑनलाइन पाहिलेल्या डिझाइनची छायाचित्रे विक्रेत्यांना दाखवून त्याच प्रकारच्या राख्यांची मागणी करत आहेत. ग्राहकांचा हा बदलता कल लक्षात घेऊन पारंपरिक राख्यांसह नव्या पिढीला आवडतील अशा आधुनिक डिझाइनच्या राख्यांचाही मोठा साठा विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती विक्रेते विकास जैन यांनी दिली. यामुळे यंदाच्या रक्षाबंधनात आधुनिक फॅशन आणि पारंपरिक संस्कृतीचा सुंदर संगम बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.
