शिर्डी : साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येत असताना मंदिर परिसरात वाढलेल्या भिक्षेकऱ्यांमुळे भाविकांना होणाऱ्या त्रासाच्या तक्रारींनंतर शिर्डी पोलीस, शिर्डी नगरपरिषद आणि श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत मंदिर परिसरातून ५५ पुरुष आणि १५ महिला अशा एकूण ७० भिक्षेकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पहाटेपासून सुरू झालेल्या या मोहिमेत ताब्यात घेतलेल्या सर्व भिक्षेकऱ्यांना साईबाबा संस्थानच्या पार्किंग परिसरात आणण्यात आले. संस्थानच्या वतीने त्यांच्यासाठी नाश्ता आणि चहाची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर पोलीस प्रशासनाने सर्वांची नावे, पत्ते, छायाचित्रे आणि ओळखपत्रांची पडताळणी केली. पुढे सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना राहाता न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार महिला भिक्षेकऱ्यांना मुंबई येथील तर पुरुष भिक्षेकऱ्यांना अहिल्यानगर जिल्ह्यातील विसापूर येथील भिक्षेकरी सुधारगृहात पाठविण्यात आले. शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी या कारवाईची माहिती देताना सांगितले की, भाविकांकडून सातत्याने मिळणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. मंदिराच्या चारही बाजूंना भिक्षेकरी भाविकांचा पाठलाग करत असल्याने तसेच वारंवार पैसे मागून त्रास देत असल्याने प्रशासनाने कठोर पाऊल उचलले.
शिर्डीत येणाऱ्या अनेक भाविकांनी भिक्षा न दिल्यास भिक्षेकऱ्यांकडून कपडे ओढणे, गैरवर्तन करणे, सतत मागे लागणे अशा प्रकारांच्या तक्रारी केल्या होत्या. याशिवाय अनेक भिक्षेकरी नशेच्या अवस्थेत मंदिर परिसरात फिरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी या भिक्षेकऱ्यांच्या मागे एखादे संघटित रॅकेट कार्यरत असण्याची शक्यता व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दिवसभरात भिक्षा मागून जमा झालेल्या पैशांपैकी भिक्षेकऱ्यांना केवळ दारू किंवा जेवणासाठी थोडी रक्कम दिली जाते, तर उर्वरित पैसे इतरांकडून घेतले जात असल्याचा संशय आहे. या प्रकाराची अधिक चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. साईभक्तांची सुरक्षा, मंदिर परिसरातील सुव्यवस्था आणि भाविकांना त्रासमुक्त वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी अशा कारवाया आवश्यक असल्याचे प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे भविष्यातही अशा प्रकारच्या संयुक्त मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असून, दर १५ दिवसांनी विशेष कारवाई केली जाईल, असे अभय शेळके यांनी स्पष्ट केले. प्रशासनाने भाविकांना कोणताही त्रास होत असल्यास त्वरित पोलीस किंवा संस्थान प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही केले आहे.
