पालघर : राज्यातील गरोदर महिला, स्तनदा माता तसेच लहान मुलांना अधिक सकस, पौष्टिक आणि चवदार आहार मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाने पोषण आहारामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांनुसार आता पोषण आहारात पुलावाचा समावेश करण्यात आला असून, त्यासोबत प्रीमिक्स आणि विशेष मसाल्याची पाकिटेही दिली जाणार आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना मिळणारा आहार अधिक रुचकर होण्यास मदत होणार आहे. राज्य सरकारकडून महिला आणि बालकांच्या पोषणासाठी विविध योजना राबविल्या जात असून, गेल्या दोन वर्षांपासून गरोदर महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांना घरपोच पोषण आहार पुरविण्याची योजना सुरू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांपर्यंत नियमितपणे पौष्टिक अन्न पोहोचविले जाते. यंदा या योजनेत आणखी सुधारणा करत गौरी-गणपती उत्सवापासून म्हणजेच सप्टेंबर महिन्यापासून नवीन स्वरूपातील पोषण आहाराचे वितरण सुरू करण्याचे नियोजन महिला व बालविकास विभागाने केले आहे. नव्या आहारामध्ये पौष्टिकतेसोबतच चवीलाही महत्त्व देण्यात आले असून, लाभार्थ्यांना आहार अधिक आवडीने सेवन करता यावा हा यामागील उद्देश आहे. विशेषतः गरोदर महिला, स्तनदा माता आणि ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील बालकांच्या पोषणाची गरज लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांच्या आहारातील पोषणमूल्य वाढण्याबरोबरच त्यांच्या आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
राज्यातील कुपोषणग्रस्त जिल्ह्यांमध्ये पालघर जिल्ह्याचा समावेश असून, गेल्या दशकात येथे कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. तरीही आदिवासीबहुल भागांमध्ये महिला व बालविकास विभाग तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून गरोदर माता आणि लहान मुलांना सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपाययोजना सातत्याने राबविल्या जात आहेत. शासनाच्या नव्या निर्णयाचा लाभ पालघर जिल्ह्यातील हजारो लाभार्थ्यांना मिळणार आहे. जिल्ह्यात सध्या ११ हजार ५८ गरोदर महिला, तर ३ महिने ते ६ वर्षे वयोगटातील ५५ हजार ४४९ बालके या योजनेचे लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यातील ३ हजार ३५७ अंगणवाड्यांमार्फत पोषण आहाराचे वितरण केले जाते. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शासनस्तरावर करण्यात आलेले हे बदल लाभार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. सप्टेंबर महिन्यापासून नव्या स्वरूपातील अधिक चवदार आणि पौष्टिक आहाराचे वितरण सुरू होईल. जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरपोच पोषण आहार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे. या बदलामुळे गरोदर महिला, स्तनदा माता आणि लहान मुलांना अधिक दर्जेदार पोषण मिळण्यास मदत होईल, तसेच कुपोषण कमी करण्याच्या राज्य शासनाच्या प्रयत्नांना आणखी बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

