पंढरपूर : आषाढी वारीदरम्यान प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवेचा वापर करून गंभीर आजारी भाविकाला तातडीने उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले. श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी छत्रपती संभाजीनगर येथून पंढरपूरला आलेले बाळू आसाराम पडूळ (वय ५४) यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्याने त्यांना तातडीने तीन रस्ता येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील तपासणीसाठी त्यांना उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. रुग्णालयात ईसीजी तपासणी केल्यानंतर त्यांच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी त्वरित सोलापूर येथे हलविण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने यंदाच्या आषाढी वारीसाठी प्रथमच उपलब्ध करून दिलेल्या एअर ॲम्ब्युलन्स सेवेद्वारे त्यांना सोलापूरला नेण्यात आले. तेथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले असून हृदयरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
दरम्यान, एअर ॲम्ब्युलन्स सोलापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विमानतळावर जाऊन रुग्णाची भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी उपस्थित डॉक्टरांकडून रुग्णाच्या उपचारांची सविस्तर माहिती घेत आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. आषाढी वारीसाठी दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरमध्ये दाखल होत असल्याने आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना त्वरित उच्चस्तरीय वैद्यकीय सेवा मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने यंदा प्रथमच एअर ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे गंभीर रुग्णांना अल्पावधीत मोठ्या रुग्णालयात हलविणे शक्य झाले असून, आषाढी वारीच्या इतिहासात प्रथमच या सुविधेचा प्रत्यक्ष लाभ एका भाविकाला मिळाला.

