मुंबई : “आई, मी रविवारी दुपारी फोन करतो. घरी जेवायला येणार की नाही ते सांगतो,” असे सांगून घराबाहेर पडलेल्या २५ वर्षीय विश्वास सातिम याचा तो आपल्या आईशी झालेला शेवटचा संवाद ठरला. मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राजगड किल्ल्यावर पदभ्रमणासाठी निघालेल्या विश्वासचा पाबे घाटातील भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला. मुंबईतील विलेपार्ले येथील नेहरूनगर परिसरात राहणारा विश्वास सातिम हा रविवारी पहाटे घडलेल्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडला. मिळालेल्या माहितीनुसार, राजगडकडे जाणारी खासगी लहान बस पाबे घाटातील एका तीव्र वळणावर आली असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बसने संरक्षक कठडा तोडत सुमारे ४० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात विश्वास सातिमसह आणखी दोघांचा मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक, पोलीस आणि प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
मूळचा रायगड जिल्ह्यातील संदेरी गावचा असलेला विश्वास सातिम हा मनमिळाऊ आणि हसमुख स्वभावामुळे मित्रपरिवारात लोकप्रिय होता. त्याला लहानपणापासून क्रिकेटची विशेष आवड होती. नोकरी सांभाळत तो विविध क्रिकेट स्पर्धांमध्येही सहभागी होत असे. शनिवार-रविवारच्या सुट्टीत मित्रांसोबत राजगडावर जाण्याचा बेत आखून तो घरातून बाहेर पडला होता. घरातून निघताना त्याने आईला दुपारी फोन करून घरी जेवायला येणार की नाही हे सांगण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अपेक्षित फोन येण्याऐवजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला आणि विश्वास अपघातात जखमी झाल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. त्यानंतर सकाळी सुमारे आठ वाजता त्याच्या निधनाची दुर्दैवी बातमी घरच्यांना कळविण्यात आली. ही बातमी समजताच सातिम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात आणि मित्रपरिवारातही शोककळा पसरली आहे.

