ठाणे : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतल्यानंतर ठाण्यातील युवासेनेच्या वतीने व्यावहारिक मराठी भाषा मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्ग सोमवार ४ मे पासून दर सोमवार ते शनिवार दुपारी १२ ते १ यावेळेत विद्या प्रसारक संस्थेचे विद्यालय व महाविद्यालय बाळकुम रोड, माजिवडा, ठाणे(प) येथे असणार आहेत. परवानाधारक रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी १ मे पासून मराठी भाषा अनिवार्य करण्यात येत आहे. मराठी लिहीता आणि वाचता न येणाऱ्यांचे तसेच मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्यांचे वाहन परवाने रद्द करण्यात येतील असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयानंतर ज्या परप्रांतिय रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालकांना मराठी भाषा येत नाही, त्यांच्या अडचणी वाढणार आहे.
परंतु युवासेना कार्याध्यक्ष ‘पूर्वेश सरनाईक’ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना ठाणे शहर विधानसभा उपाध्यक्ष ‘विकेश संजय भोईर’ यांच्या संकल्पनेतून व्यावहारिक मराठी भाषा मोफत शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरातील विविध भागात सध्या मराठी शिकण्याचे हे बॅनर झळकत आहे. हे बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधून घेत आहेत. भाजपाच्या वतीने देखील परप्रांतीय रिक्षाचालक आणि फेरीवाल्यांसाठी सात दिवसांचे विशेष मराठी शिकवणी वर्ग सुरू करण्यात आले आहेत. सध्या ठाण्यातील कोपरी, कळवा आणि वर्तकनगर भागात हा उपक्रम सुरु झाला असून यात १०० जणांनी सहभाग घेतल्याची माहिती आहे. ज्या राज्यात आपण राहतो, तेथील भाषा आलीच पाहिजे, तसेच या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे भाजपचे ठाणे शहर चिटणीस ॲड. दिनानाथ पांडे यांनी सांगितले होते. तसेच कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) आपल्या ७२ शाखांमध्ये आणि मुंबई मराठी साहित्य संघ ऑनलाइन माध्यमातून अमराठी वाहनचालकांना जुजबी व्यावहारिक मराठी शिकवणार आहेत. चालकांना प्रवाशांशी संवाद साधता यावा यासाठी ‘कुठे जायचे’, ‘बसा’, ‘चला सोडतो’ अशा दैनंदिन वापरातील सोप्या मराठी वाक्यांचा सराव या वर्गांमध्ये घेतला जात आहे.

