ठाणे : गुरुवारी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास स्वारगेटहून ठाणे मार्गे वसईकडे निघालेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसला ठाणे सॅटीस पुलावर अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. बस ठाणे एसटी स्थानकातून प्रवाशांना घेऊन मार्गस्थ झाल्यानंतर सॅटीस पुलाच्या चढणीवर पोहोचताच आगीने अचानक उग्र रूप धारण केले. या बसमध्ये एकूण २० प्रवासी, चालक आणि वाहक उपस्थित होते. आग लागल्याचे लक्षात येताच चालक आणि वाहक यांनी तत्परता दाखवत सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही, अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. प्राथमिक तपासात वातानुकूलन यंत्रणेमध्ये बिघाड झाल्यामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, सॅटीस पुल हा ठाणे शहरातील महत्त्वाचा वाहतूक दुवा असून येथून टीएमटी बस सेवा विविध भागांकडे धावते. पुलाचा रस्ता अरुंद असल्यामुळे एकावेळी एकच बस या मार्गावरून जाऊ शकते. या आगीच्या घटनेमुळे पुलावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली आणि टीएमटी बसांच्या लांबच लांब रांगा लागल्या. परिणामी, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तसेच बसची प्रतीक्षा करत थांब्यावर उभे राहावे लागले. शिवशाही बसमध्ये वारंवार होत असलेल्या बिघाडांमुळे आणि अशा घटनांमुळे या सेवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, बसच्या देखभालीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

