पनवेल : कळंबोली येथील सेक्टर १७ मधील मैदानात २५ एप्रिल रोजी प्रस्तावित भव्य संगीत रजनी (कॉन्सर्ट) अखेर रद्द करण्यात आली असून, सिडको मंडळाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. स्थानिक रहिवासी संघटनांच्या तीव्र विरोधानंतर आणि पोलीस विभागाच्या नकारात्मक अभिप्रायाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. कळंबोली परिसरातील जागरूक नागरीक, सामाजिक संस्था व रहिवासी संघटनांनी या कार्यक्रमामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत सिडको आणि पोलीस प्रशासनाकडे लेखी निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत कळंबोली पोलिसांनी सिडको मंडळाकडे आपला अभिप्राय सादर केला.
या अभिप्रायात संभाव्य गर्दी, सुरक्षेचे प्रश्न आणि अनुचित प्रकार टाळण्यासाठी कार्यक्रमास परवानगी देऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी मुंबईतील नेस्को येथे नुकत्याच झालेल्या कॉन्सर्टदरम्यान घडलेल्या घटनांचा विचार करून शुक्रवारी या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला. संबंधित कार्यक्रम २१ ते २६ एप्रिलदरम्यान आयोजित करण्याचे नियोजन होते. मुंबई अंधेरी येथील डी.एन.ए. एंटरटेनमेंट नेटवर्क प्रा. लि. या कंपनीने २ एप्रिल रोजी सिडकोकडे मैदान भाड्याने देण्याबाबत अर्ज केला होता. दरम्यान, या निर्णयाचे स्थानिक स्तरावर स्वागत करण्यात आले आहे. रोडपाली येथील रहिवाशांनी प्रशासनाने समाजाप्रती जबाबदारीची जाणीव ठेवत योग्य निर्णय घेतल्याची भावना व्यक्त केली.नवी मुंबई परिसरात अमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर अशा कार्यक्रमांतून नशेखोरीला प्रोत्साहन मिळू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली होती. आर.आर.डब्ल्यू.ए. या रहिवासी संघटनेने पुढाकार घेत या कार्यक्रमाला विरोध दर्शविला होता. सिडको आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
