नवी मुंबई : अभिज्ञान अभिषेक कुंडू या अंडर-१९ विश्वचषक विजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या उपकर्णधाराचा नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे गौरव करण्यात आला. शुक्रवारी पार पडलेल्या महासभेत महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते सभागृहाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांचे प्रशिक्षक चेतन जाधव यांनाही सन्मानित करण्यात आले. नवी मुंबईसाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे प्रतिपादन महापौरांनी यावेळी केली.
फेब्रुवारी २०२६ मध्ये झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पार पडलेल्या आयसीसीच्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत यष्टिरक्षक-फलंदाज म्हणून खेळताना कुंडू यांनी चार अर्धशतके झळकावून एकूण २३९ धावा केल्या. संघातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून त्यांची नोंद झाली. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध भारताने विजय मिळवत विश्वचषक जिंकला, त्यात कुंडू यांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. महासभेत उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ. कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, क्रीडा समिती सभापती गिरीश म्हात्रे व उपसभापती राजू मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. सभागृह नेते सागर नाईक यांनी मांडलेल्या अभिनंदन प्रस्तावास विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी अनुमोदन दिले. महापौर, उपमहापौर आणि आयुक्तांनी आपल्या मनोगतातून कुंडू यांच्या यशाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

