मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवतीर्थावर जोरदार भाषण केलं. या जाहीर सभेत राज ठाकरे यांनी क्रिकेट आणि महाराष्ट्राच्या भविष्यावर जोरदार हल्ला चढवला. ठाकरे यांनी त्या काळाची आठवण करुन दिली, जेव्हा मुंबईचे खेळाडू भारतीय क्रिकेट संघाचा कणा होते. ते म्हणाले की, एक काळ असा होता जेव्हा सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांसह एकट्या मुंबईचेच आठ ते नऊ खेळाडू राष्ट्रीय संघात होते. पण आज परिस्थिती बदलली आहे.
सभेत बोलताना राज ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, “आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी खेळाडू नाही.” सध्याच्या संघात सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांच्यासारखे मुंबईत वाढलेले खेळाडू असले तरी, ठाकरे प्रामुख्यानं मराठी प्रतिनिधित्वाच्या अभावावर बोलत होते. त्यांनी आरोप केला की, महाराष्ट्रात खेळाडू घडवण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळं आता एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे म्हणाले, “आज भारतीय क्रिकेट संघात एकही मराठी खेळाडू दिसत नाही. एक काळ होता जेव्हा ११ पैकी ८ ते ९ खेळाडू मुंबईचे असायचे. आज आपण कुठं मागे आहोत याचा विचारही करत नाही. महाराष्ट्रात खेळाडू घडवण्याची कल्पनाच पूर्णपणे नाहीशी झाली आहे.”

