मुंबई : महापालिका निवडणुकांचा निकाल लागून १५ दिवसांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर महापौर आणि उपमहापौरपदांची नावे जाहीर करण्यात आलीत. भाजपाच्या रितू तावडे या मुंबईच्या नव्या महापौर होणार असून, शिवसेना (शिंदे गट) नेते संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड निश्चित झालीय. भाजपा आणि शिवसेनेच्या आज झालेल्या संयुक्त बैठकीत या दोन्ही नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौरपदासाठी रितू तावडे यांच्या नावाची घोषणा केली, तर शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी उपमहापौरपदासाठी संजय घाडी यांचे नाव जाहीर केलंय.
घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक १३२ मधून निवडून आलेल्या रितू तावडे या दुसऱ्यांदा नगरसेविका बनल्या आहेत. गुजरातीबहुल मतदारसंघातून निवडून येऊनही त्या मराठी चेहरा म्हणून ओळखल्या जातात. यापूर्वी त्यांनी शिक्षण समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळलीय. प्रशासकीय अनुभव आणि पक्षातील मजबूत पकड यामुळे त्यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर होते. रितू तावडे यांना महापौरपद देत भाजपाने मराठी अस्मिता आणि गुजराती मतदार या दोन्ही समीकरणांचा विचार केल्याची चर्चा आहे. मराठी महापौर देत विरोधकांच्या अस्मितेच्या राजकारणाला उत्तर देण्यासोबतच गुजराती मतदारांनाही प्रतिनिधित्व मिळाल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे मुंबईत मराठी-गुजराती सोशल इंजिनीअरिंगचा प्रयोग भाजपाकडून करण्यात आल्याचे मानले जाते. ८९ जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला असून, यंदा सलग दुसऱ्यांदा मुंबईला महिला महापौर मिळणार आहे. महापौरपद भाजपाकडे तर उपमहापौरपद मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या सव्वा वर्षासाठी संजय घाडी यांना उपमहापौरपदाची संधी देण्यात आलीय. दरम्यान, शिवसेनेच्या (ठाकरे गट) माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी वॉर्ड क्रमांक १९९ मधून विजय मिळवत पुन्हा ताकद दाखवली असून, त्यांची महापालिकेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्या नव्या सभागृहात आक्रमक विरोधी पक्षनेत्या म्हणून भूमिका बजावण्याची शक्यता आहे.

