पुणे : पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दिवशी शहरात एक विरोधाभासी चित्र पाहायला मिळाले. एकीकडे लोकशाहीचा उत्सव साजरा होण्याची अपेक्षा, तर दुसरीकडे मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवत पर्यटनस्थळे आणि तीर्थक्षेत्रांकडे मोर्चा वळवला. याचे ठळक उदाहरण म्हणजे सिंहगड. सकाळी अकरा वाजेपर्यंतच सिंहगडावर तब्बल पाच हजारांहून अधिक नागरिकांनी हजेरी लावल्याची माहिती समोर आली आहे.
निवडणूक आयोग, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या जनजागृती मोहिमा, आवाहने आणि सोयीसुविधांनंतरही नागरिकांचा हा कल अनेक प्रश्न उपस्थित करणारा ठरतो. “आधी फिरून येऊ, नंतर मतदान करू” या मानसिकतेतून अनेकांनी थेट पर्यटनस्थळे गाठली. मात्र दुपारनंतर मतदानासाठी परत येण्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे चित्र अनेक प्रभागांमध्ये दिसून आले. राजकीय विश्लेषकांच्या मते, हा केवळ निवडणुकीतील हलगर्जीपणा नसून तो शहरी मतदारांच्या वाढत्या उदासीनतेचे द्योतक आहे. “सगळेच पक्ष सारखे आहेत”, “निवडून आले तरी काही फरक पडत नाही”, अशी भावना शहरातील मध्यमवर्गीय आणि तरुण मतदारांमध्ये खोलवर रुजत चालली आहे. याच भावनेचा परिणाम म्हणजे मतदानाचा हक्क बाजूला ठेवून विरंगुळ्याला दिलेले प्राधान्य. विशेष म्हणजे, सिंहगडासह शहराभोवतालच्या इतर पर्यटनस्थळांवर, देवस्थानांवर आणि मॉल्समध्येही गर्दी दिसून आली. सकाळी लवकर मतदान करून नंतर फिरायला जाण्याऐवजी, अनेकांनी थेट पर्यटनालाच पसंती दिली. यामुळे “मतदान हा कर्तव्याचा भाग आहे” ही लोकशाहीची मूलभूत जाणीवच फिकी पडत चालली असल्याचे चित्र आहे. राजकीय पक्षांसाठीही हा इशारा मानला जात आहे. निवडणूक प्रचारात मोठमोठी आश्वासने, आरोप-प्रत्यारोप आणि जाहिरातबाजी होत असली, तरी सामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर ठोस उपाय न दिसल्याने मतदारांचा विश्वास ढासळत आहे.

