मुंबई : राज्यातील इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ आता ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेतली जाणार आहे. राज्य परीक्षा परिषद (MSCE) यांनी हा बदल अधिकृत पत्रकाद्वारे जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी नवीन परीक्षेची तारीख लक्षात ठेवून आवश्यक ते नियोजन करावं, असं आवाहन परिषदेकडून करण्यात आलं आहे.
८ फेब्रुवारी २०२६ रोजी सीटीईटी (केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा) आयोजित करण्यात येत असल्याने शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे. राज्यातील हजारो शिक्षक सीटीईटी परीक्षेला बसणार असून, याच शिक्षकांवर शिष्यवृत्ती परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्रांवरील देखरेखीची जबाबदारी येते. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेतल्यास केंद्रांवर आवश्यक कर्मचारी कमी पडण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर शिक्षक, प्राचार्य आणि प्रशासन यांच्या मागणीनुसार शिष्यवृत्ती परीक्षा ८ फेब्रुवारीऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळते, ज्यामुळे पुढील शिक्षणाला आर्थिक आणि मानसिक आधार मिळतो. अनेक विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा पुढील वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरते, असं करिअर काउन्सिलर आणि शिक्षक जयवंत कुलकर्णी सांगतात.

