ठाणे : अग्निशामक दलाचे जवान जीव धोक्यात टाकून जनसेवा करत असतात. अनेकदा आगीच्या मोठ्या दुर्घटना घडतात. यावेळी अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पुढे धावतात. तसेच नदीपात्रात एखादी व्यक्ती अडकली असेल, एखाद्या मोठ्या इमारतीवर कुणी अडकलं असेल किंवा भूसख्खलनाच्या घटना असतील, अशा अनेक संकट काळात अग्निशामक दलाचे जवान मदतीसाठी पुढे असतात. पण मदतकार्यत कधीकधी एखादी घटना अशी घडते की ती जवानाच्या जीवावर बेतते. ठाणे जिल्ह्यातील दिव्यातील एका गावात अशी दुर्देवी घटना घडली आहे.
दिव्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. कबुतराचा जीव वाचवताना अग्निशामक दलाच्या जवानाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. उत्सव अशोक पाटील असं या जवानाचं नाव होते. हा जवान अवघ्या २८ वर्षांचा होता. दिव्यातील दातीवली गावचे ते रहिवासी होते. कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. संबंधित घटना ही रविवारी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. उत्सव पाटील हे अत्यंत तत्पर आणि जबाबदार जवान म्हणून ओळखले जात होते. खर्डीगाव येथील ओव्हरहेड वायर्सवर एक कबूतर अडकले असल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशामक दलाकडून बचावकार्य सुरू करण्यात आले होते. यावेळी बचाव मोहिमेत सहभागी असलेल्या उत्सव पाटील यांना विजेचा तीव्र धक्का बसून ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची पुष्टी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.