वृत्तसंस्था : ज्येष्ठ अभिनेत्री, नृत्यांगना संध्या शांताराम यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९४ वर्षाच्या होत्या. संध्या शांताराम यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. ‘पिंजरा’ चित्रपटामधील त्यांची अजरामर भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम स्मरणात आहे. संध्या शांताराम यांच्या पार्थिवावर आज शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार पार पडले. संध्या यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटात आपला ठसा उमटवला होता. अप्रतिम अभिनय आणि नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मानावर एक वेगळी छाप पाडली. अमर भूपाळी, ‘झनक झनक पायल बाजे’, ‘दो आंखें बारह हाथ’, वरंग, जल बिन मछली नृत्य बिन बिजली यासारख्या चित्रपटात अजरामवर भूमिका साकरल्या. संध्या या प्रसिद्ध दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. संध्या शांताराम यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झालेय.
संध्या शांताराम यांचं मूळ नाव विजया देशमुख असे होते. त्यांचा जन्म १३ सप्टेंबर १९३६ रोजी झाला होता. त्या प्रसिद्ध दिग्दर्शक वी. शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या, त्यांचे १९५६ मध्ये लग्न झाले होते. संध्या यांना आवाजामुळे व्ही शांताराम यांनी ‘अमर भूपाली’ (१९५१) या मराठी चित्रपटासाठी निवडले होते. संध्या यांनी शांताराम यांच्या अनेक चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका केल्या. संध्या या अभिनेत्री वत्सला देशमुख यांच्या भगिनी होत्या. तर दिवंगत रंजना देशमुख यांच्या त्या मावशी होत्या. रंजना यांनी अभिनय आणि नृत्याचे धडे संध्या यांच्याकडूनच गिरवले होते. संध्या यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातील एक पर्व आपल्या नृत्याने गाजवलं होतं. त्यांच्या अभिनय आणि नृत्याने रंगलेला पिंजरा हा सिनेमा आजही मराठीतीतील क्लासिक सिनेमा म्हणून ओळखला जातो.