वृत्तसंस्था : आशिया कपचा रोमांच रंगतदार होत चालला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सुपर फोरमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. आज टीम इंडियाचा सामना ओमानविरुद्ध होणार असून, हा सामना केवळ सुपर फोरच्या तयारीपुरता मर्यादित नाही, तर तो भारतीय क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण आहे. आज भारतीय संघ एक असा पराक्रम करणार आहे, जो यापूर्वी फक्त पाकिस्ताननेच केला आहे.
आज ओमानविरुद्धचा सामना भारतीय क्रिकेट संघाचा २५०वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना असेल. यापूर्वी ही कामगिरी केवळ पाकिस्तानने केली आहे, ज्यांनी आतापर्यंत २७५ टी२० सामने खेळले आहेत. आता भारत हा टप्पा पार करणारा दुसरा संघ बनेल. सूर्यकुमार यादवसाठीही हा सामना खास असेल, कारण कर्णधार म्हणून त्याचा हा २५ वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आहे. आतापर्यंत त्याने २४ सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी १९ सामन्यांत भारताने विजय मिळवला, तर ४ मध्ये पराभव झाला. एका सामन्याचा निकाल बरोबरीत राहिला. कर्णधार म्हणून त्याने २४ सामन्यांत ६१२ धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा समावेश आहे. ओमानसारख्या तुलनेने कमकुवत संघाविरुद्ध टीम इंडियाचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.