मुंबई : दिवाळीचा सण जवळ येत असतानाच महागाईने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका दिला आहे. रोजच्या स्वयंपाकातील अत्यावश्यक असलेल्या कांद्याच्या दरात अचानक झालेल्या वाढीमुळे ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. किरकोळ बाजारात चांगल्या दर्जाचा कांदा प्रतिकिलो ८० रुपयांपर्यंत पोहोचला असून, दिवाळीच्या खरेदीसोबतच घरगुती खर्चातही मोठी वाढ झाली आहे. गृहिणींचे मासिक बजेट कोलमडले असून, व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार पुढील दीड महिनाभर कांद्याच्या दरात मोठी घट होण्याची शक्यता कमी आहे. गेल्या काही दिवसांपासून घाऊक बाजारात कांद्याचे दर सातत्याने वाढत असून, बाजार समित्यांमध्ये प्रतिकिलो ५५ ते ६५ रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. याशिवाय वाहतूक खर्च आणि कमिशनमुळे विक्रेत्यांचा खर्च वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांना कांदा ६५ ते ७० रुपये किलो दराने खरेदी करावा लागत आहे. परिणामी ग्राहकांना किरकोळ बाजारात ८० रुपये किलो दराने कांदा घ्यावा लागत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली असताना पुरवठा मर्यादित असल्याने दर आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कांद्याच्या दरवाढीमागे जुन्या कांद्याचा साठा जवळपास संपुष्टात येणे आणि नवीन पीक मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यास विलंब होणे ही प्रमुख कारणे असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ग्राहकांना आणखी काही काळ महागडा कांदा खरेदी करावा लागणार आहे. कांद्याबरोबरच लसूण आणि आल्याच्या दरांनीही सर्वसामान्यांचे बजेट विस्कळीत केले आहे. घाऊक बाजारात लसणाचे दर प्रतिकिलो २५० ते ३०० रुपये असून, किरकोळ बाजारात तो ३२० ते ४०० रुपये किलो दराने विकला जात आहे. थंडीच्या दिवसांत लसणाची मागणी वाढण्याची शक्यता असल्याने त्याचे दरही चढे राहण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, जुन्या आल्याचा साठा संपल्यामुळे बाजारात नवीन आले दाखल झाले असून, त्याचे दर प्रतिकिलो ८० ते १०० रुपये आहेत. कांदा, लसूण आणि आले या तिन्ही अत्यावश्यक पदार्थांच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरावरील आर्थिक ताण वाढला असून, सणासुदीच्या काळात महागाईचा फटका अधिक तीव्रपणे जाणवत आहे. ग्राहकांना आवश्यक वस्तूंसाठी अधिक खर्च करावा लागत असल्याने दिवाळीचा आनंद महागाईमुळे काहीसा फिका पडत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळत आहे.

