मुंबई : मुंबईतील ससून गोदी येथे कार्यरत महिला मच्छीमारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत राज्य सरकारने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. ‘मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना’ अंतर्गत महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वाटप करण्यात येणार असून, हा कार्यक्रम २८ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता ससून गोदीतील नेट मेंडिंग हॉल, राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षण इमारत येथे पार पडणार आहे. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात महिला मच्छीमारांना हातमोजे, सुरक्षा शूज, हेड गिअर, फिंगर कॉटन आणि मास्क यांचा समावेश असलेले सुरक्षा किट देण्यात येणार आहे. दैनंदिन कामकाजादरम्यान होणाऱ्या अपघातांचा धोका कमी करणे, आरोग्याचे संरक्षण करणे आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री नितेश राणे, आमदार चित्रा वाघ, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे आणि राष्ट्रीय मत्स्यकी सर्वेक्षणचे संचालक श्रीनाथ के. आर. उपस्थित राहणार आहेत.
राज्यात मत्स्य क्षेत्राचा शाश्वत विकास साधण्यासाठी आणि मच्छीमारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना राबविण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ब्ल्यू इकॉनॉमी’ संकल्पनेला चालना देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या योजनेद्वारे आधुनिक सुविधा, तंत्रज्ञान आणि आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात आहे. त्याचबरोबर मच्छीमारांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि कामाच्या दर्जात सुधारणा करण्यावरही भर देण्यात येत आहे. ससून गोदीतील महिला मच्छीमारांना सुरक्षा किटचे वितरण हा त्याच प्रयत्नांचा एक महत्त्वाचा भाग असून, त्यांच्या श्रमाला सुरक्षितता, सन्मान आणि बळ देणारा हा उपक्रम ठरणार आहे. महिला मच्छीमारांना आवश्यक संरक्षण साहित्य उपलब्ध झाल्यामुळे त्यांचे काम अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यास मदत होणार असून, मत्स्य व्यवसायातील महिलांच्या सक्षमीकरणासाठीही हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
