वृत्तसंस्था : डिजिटल मनोरंजनाच्या क्षेत्रात आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी इन्स्टाग्रामने मोठ्या बदलाची तयारी सुरू केली आहे. कंपनी सध्या ९० मिनिटांपर्यंतचे आडवे (Horizontal) व्हिडिओ अपलोड करण्याच्या नव्या सुविधेची चाचणी घेत आहे. या फिचरमुळे पॉडकास्ट, कॉमेडी शो आणि लाँग-फॉर्म व्हिडिओ थेट इन्स्टाग्रामवर पाहता येणार आहेत. सुरुवातीला अमेरिकेतील निवडक कंटेंट क्रिएटर्ससोबत या सुविधेची चाचणी सुरू असून, रील्समधून एका क्लिकवर संपूर्ण व्हिडिओ पाहण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सध्या ३ मिनिटांपर्यंत मर्यादित असलेल्या रील्सनंतर वापरकर्त्यांना थेट पूर्ण पॉडकास्ट किंवा मोठा व्हिडिओ पाहण्याचा पर्याय मिळणार आहे.
इन्स्टाग्रामच्या प्रॉडक्ट व्हाइस प्रेसिडेंट टेसा लियॉन्स यांनी सांगितले की, एखाद्या पॉडकास्टची छोटी क्लिप आवडल्यास वापरकर्ता त्याच ठिकाणाहून संपूर्ण भाग पाहू शकेल. या सुविधेची पहिली चाचणी ब्राझीलमध्ये यशस्वी झाल्यानंतर आता अमेरिकेत तिचा विस्तार करण्यात आला आहे. हे व्हिडिओ एक्सप्लोर पेज आणि फीडमध्येही शिफारस म्हणून दिसतील. तसेच सॅमसंग, फायर टीव्ही, गुगल टीव्हीनंतर आता ॲपल टीव्हीवरही इन्स्टाग्रामचा अनुभव उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. या नव्या सुविधेमुळे इन्स्टाग्राम थेट युट्यूबला स्पर्धा देण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकत असल्याचे मानले जात आहे.

