मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न, विविध विकासकामांमुळे पाइपलाइन फुटण्याच्या घडलेल्या घटनांमुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यास अडचणी येतात. त्यामुळे मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी पिसे-पांजरापोळ जलशुद्धीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत २१ किमीचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. सध्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे सर्वेक्षण सुरू असून या कामासाठी तब्बल ४ हजार ५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
मुंबईला पाणीपुरवठा हा अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सात तलावांतून होतो. सातही तलावांची पाणीसाठवण क्षमता ही १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर आहे. या सातही तलावातून दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या जलवाहिन्यांचे बाह्य विभागामध्ये सुमारे ३८० किलोमीटर अंतराचे अतिशय मोठे असे जाळे आहे. तर ९० किलीटरचे भूमिगत जलवाहिन्यांचेही जाळे आहे. मात्र या जलवाहिन्यांना कुठेना कुठे, वेगवेगळ्या कारणांमुळे गळती लागते. काहीवेळा पाणी चोरीचाही प्रयत्न होतो आणि जलाशयातून गळती सुरू होते. विविध विकासकामांचाही जलवाहिन्यांना फटका बसतो. जलवाहिन्यांची सुरक्षा पाहता मुंबई महापालिकेने मुंबई शहर व उपनगराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे-पांजरापोळ जलशुध्दीकरण केंद्र ते मुलुंडपर्यंत २१ किलोमीटरचा जलबोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या याचे सर्वेक्षण सुरू आहे. लवकरच अहवाल तयार करून तो पालिकेला सादर होईल. जलबोगदा तयार होताच यामधूनच मुंबई शहर व पूर्व उपनगराला सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. ही जलवाहिनी जमिनीपासून १०० मीटर खोलवर असेल. सध्या या पिसे-पांजरापोळ ते मुलुंडरपर्यंत रस्त्यावरून जाणारी समांतर अशी जलवाहिनी आहे. या जलवाहिनीतून पाणी अन्य लहान जलवाहिनीमार्फत मुंबई शहर व पूर्व उपनगराला पाणीपुरवठा केला जातो. बोगदा तयार होताच यातून पाणीपुरवठा सुरू केला जाईल. त्यानंतर समांतर जाणाऱ्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. जलबोगद्याला कोणताही धोका पोहोचल्यास समांतर अशा जलवाहिनीतूनही पुन्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन असणार आहे. पिसे पांजरापोळ ते मुलुंड असा २१ किमीचा जलबोगदा तयार केला जाणार असून त्यासाठी साडेचार हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या समांतर अशी जलवाहिनी असली तरीही सुरक्षेचा प्रश्न आणि विविध कामे पाहता नवीन जलबोगदा तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
गुंदवली ते भांडुप संकुलादरम्यानच्या ५,५०० मिलीमीटर व्यासाच्या १५ किलोमीटर जलबोगद्याद्वारे भांडुप संकुल येथील जलशुद्धीकरण केंद्राला ७५ टक्के पाणीपुरवठा होतो. जलबोगद्यास ठाणे येथे कूपनलिकेचे (बोअरवेल) खोदकाम सुरू असताना हानी पोहोचून पाणी गळती सुरू झाली होती. दुरुस्तीसाठी जलबोगदा ३१ मार्च २०२३ पासून बंद करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेला एक महिन्यासाठी १५ टक्के कपात जाहीर करावी लागली होती. यामध्ये कूपनलिकेचे काम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला ७५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. हा दंड अद्यापही वसूल झालेला नाही. सध्या घाटकोपर ते परळ अशा आणखी एक जलबोगद्याचे काम मुंबई महापालिकेने हाती घेतले आहे. हा जलबोगदा ११० किमी खोलवर आहे. याचेही काम पूर्ण करण्यासाठी काही कालावधी लागेल. मुंबईत काही भागातून जाणाऱ्या जलवाहिन्या या उघड्यावर आहेत, तर काही भूमिगत आहेत. मात्र उघड्यावरील जलवाहिन्यांचा धोका पाहता जलबोगदे तयार केले जात आहेत.