लातूर – बुधोडा गाव – अलीकडेच अहमदपूर तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना वक्फ न्यायाधिकरणाकडून नोटिसा प्राप्त झाल्याची घटना ताजे असतानाच आता आणखी एका गावातील शेतकऱ्यांना देखील अशीच नोटिसा मिळाल्या आहेत. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील बुधोडा गावातील २५ शेतकऱ्यांना वक्फ ट्रिब्यूनलकडून नोटिसा आले आहेत. या नोटिसांमध्ये जवळपास १५० ते १७५ एकर जमिनीवर वक्फचा दावा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील समशाद अझगर हुसैन यांनी वक्फ न्यायाधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवरून वक्फ ट्रिब्यूनलने बुधोडा गावातील शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या. बुधोडा गावातील शेतकरी राजेश बुधोडकर यांनी सांगितले की, आमच्याकडे आलेली नोटीस तारीख संपल्यानंतर आली होती. त्यामुळे आम्ही ४ डिसेंबरला उपस्थित होऊन प्रकरण समजून घेण्यासाठी वकील नेमला आहे. पुढील सुनावणीची तारीख २८ डिसेंबर दिली आहे, असं ते म्हणाले.
राजेश बुधोडकर यांनी हेही सांगितले की, आम्ही २५ शेतकऱ्यांनी एक वकील नेमला आहे. १९५५ मध्ये माझ्या आजोबाच्या नावावर ही जमीन आली होती आणि आज चौथ्या पिढीपर्यंत आम्ही या जमिनीवर काम करत आहोत. मात्र आता अचानक हा दावा केला जात आहे. अशा प्रकारे आम्हाला वक्फ ट्रिब्यूनलकडून विनाकारण त्रास दिला जात आहे.
अलीकडे राज्यभर वक्फने शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा ठोकले आहेत. लातूर जिल्ह्यातील तळेगाव गावातील ३०० एकर जमिनीवर वक्फने दावा केला होता. त्या संदर्भात वक्फ ट्रिब्यूनलने १०३ शेतकऱ्यांना नोटिसा पाठविल्या होत्या. यावर शेतकऱ्यांनी सरकारकडून हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. आणि आता बुधोडा गावात देखील हेच प्रकार घडले आहेत. यावर भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, “कोणीही शेतकऱ्यांच्या जमिनीवर दावा करु शकत नाही, आणि शेतकऱ्यांच्या मालकीची एक इंच जमीन देखील कोणी हिसकावून घेऊ शकणार नाही. मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”