मुंबई : नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई का होत नाही असा प्रश्न बहुतेक लोकांना पडत असेलच, कारण रिक्षा चालकांच्या मनमर्जी आणि अरेरावीची वागणूक बहुतेकांना पटत नाही. आता मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांविरोधात मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम राबवली असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. त्यात अद्यापपर्यंत एकूण ४२६ रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांना कायद्याचा धाक बसवण्यासाठी मुंबई पोलिसांनी २९ नोव्हेंबरपासून विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत विनापरवाना, विना गणवेश, विना बॅच, विना अनुज्ञप्ती रिक्षा चालविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच, कार्यक्षमता प्रमाणपत्र नसणे, नियमापेक्षा अधिक प्रवाशांना रिक्षात बसविणे, वाहनतळाबाहेर रिक्षा उभे करणे, अवैधरित्या प्रवाशांना बोलाविणे, भाडे नाकारणे आदी एकूण २०९९ वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. या कारवाईतून एकूण ४२६ रिक्षा जप्त करण्यात आल्या.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात सातत्याने विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणारे रिक्षा चालक आढळल्यास पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडे तक्रार दाखल करण्यासाठी १००, १०३, ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.