ठाणे : पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय मार्गावरील रेल्वे स्थानकांची नावं काही महिन्यांपूर्वी बदलण्यात आली. ही नावं बदलण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेच्या मार्गावरील महत्त्वाचं स्थानक असलेल्या मुंब्रा स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी जोर धरु लागली आहे. तत्पूर्वी मुंब्रा रेल्वे स्थानकातील फलकावर ‘मुंब्रा देवी’ असा उल्लेख असलेले फलक चिटकविण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर संबंधित फलक पोलिसांनी काढला असून याप्रकरणीची नोंद मुंब्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) पोलीस ठाण्यात करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्टेशनला ‘मुंब्रा देवी’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. ही मागणी करण्यामागचं कारण म्हणजे मुंब्रा रेल्वे स्टेशनला लागूनच प्रसिद्ध मुंब्रा देवीचे मंदिर आहे. त्यामुळेच या स्टेशनला ‘मुंब्रादेवी’ असे नाव देण्याची मागणी मागील अनेक वर्षांपासून जोर धरत आहे. या स्थानकात धिम्या रेल्वेगाड्यांना थांबा आहे. त्यामुळे लाखो प्रवासी या स्थानकातून प्रवास करत असतात. शिळफाटा, मुंब्रा भागात गोदामे देखील आहेत. त्यामुळे व्यवसायिक देखील येथून वाहतुक करतात. दुसरीकडे मुंब्रा शहरात बहुतांश वस्ती मुस्लिम समाजाची आहे.
मुंब्रा स्थानकातील नावाच्या फलकावर काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने मुंब्रा देवी उल्लेख असलेले बॅनर चिटकवला. सोशल मीडियावर देखील हे बॅनर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. घटनेची माहिती मिळताच मुंब्रा रेल्वे पोलीस दल आणि लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी हे फलक काढून टाकले. याप्रकरणी मुंब्रा रेल्वे सुरक्षा दलाच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून हे फलक कोणी लावले याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने हा तपास अधिक सोपा आणि जलद होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.