पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील पिंपरी आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरून काम (वर्क फ्रॉम होम) देण्याच्या आमिषाने दोघांची ३१ लाखांची फसवणूक झाली आहे. पिंपरीतील एका कंपनीमध्ये घरी काम देण्याचे आमिष दाखवून अनामत स्वरूपात तब्बल २२ लाखांहून अधिक रक्कम घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात एका ३४ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने फिर्यादीच्या टेलिग्रॉम ॲपवर संदेश पाठवून एका कंपनीमध्ये घरी काम देण्याचे आमिष दाखवले. तिने फिर्यादीकडून अनामतच्या स्वरूपात एकूण २२ लाख ६४ हजार ५६८ रुपये घेतले. मात्र, काम आणि अनामत स्वरूपात घेतलेली रक्कमही परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.
घरी काम देण्याचे आमिष दाखवत एका नागरिकाची नऊ लाख ६ हजार २४१ रुपयांची फसवणूक केली. ही घटना ३ मे २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत मोशी प्राधिकरण येथे घडली. याप्रकरणी एका ४८ वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलिग्राम आयडी धारकाने फिर्यादींना ग्रुपमध्ये ॲड केले. त्यानंतर त्यांचे अकाऊंट तयार करून रेटिंगच्या ॲडचे टास्क करायला लावले. या कामावर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यांवर एकूण नऊ लाख ६ हजार २४१ रुपये भरण्यास लावून त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करत आहेत.