मुंबई : आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीची रणधुमाळी जसजशी जवळ येत आहे, तसतसे राजकीय वातावरण तापू लागले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकण महोत्सवाच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मुंबईच्या भविष्याबाबत अत्यंत गंभीर विधान केले आहे. ११व्या कोकण महोत्सवात बोलताना राज ठाकरे यांनी मनसैनिकांना गाफील न राहण्याची ताकीद दिली. त्यांनी स्पष्ट केले, “मराठी माणसांसाठी मी आज एकच गोष्ट सांगतो. येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक ही शेवटची महापालिकेची निवडणूक असेल.” जर या निवडणुकीत निष्काळजीपणा दाखवला तर ती हातातून गेली म्हणून समजा, असे ते म्हणाले. या निवडणुकीनंतर मुंबईवर जे ‘थैमान’ सुरू होईल, ते कोणालाही आवरता येणार नाही, अशी थेट चिंता राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना ‘रात्र वैऱ्याची आहे’ या शब्दांत सद्यस्थितीची जाणीव करून दिली. त्यांनी मुंबईत सुरू असलेल्या राजकारणावर आणि विशेषत: मतदार याद्यांमधून सुरू असलेल्या राजकीय खेळावर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले. “आपल्या आजूबाजूला कोण मतदार खरे आहेत आणि कोण खोटे आहेत, यावर देखील आपले लक्ष असणे गरजेचे आहे,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना जागरूक राहण्यास सांगितले. मनसे आणि महाविकास आघाडीने काही दिवसांपूर्वी एकत्र येत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन केले होते.

