ठाणे : ठाणे येथील कोलशेत भागातील पार्कसिटी गृहप्रकल्पाच्या परिसरातील सुमारे २०.५ एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असतानाच, त्यापाठोपाठ आता याच परिसरात पक्षीपालनगृह उभारणीचा निर्णय घेतला आहे. यानुसार पक्षीपालनगृह ५.३ हेक्टर जागेवर विकसित केले जाणार असून यासाठी राज्य शासनाने १० कोटींचा निधी मंजुर केला आहे. यामुळे पक्षीपालनगृह उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
ठाणे शहरातील नागरिकांना मनोरंज तसेच विरंगुळ्याचे नवे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाणे महापालिका वेगवेगळी उद्याने, खाडी किनारी चौपाटीची उभारणी करत आहेत. यातूनच कोलशेत भागातील सुमारे २० एकर जागेवर ‘नमो द ग्रँड सेंट्रल पार्क’ची उभारणी करण्यात आली असूनच याच भागात टाऊन पार्कच्या माध्यमातून मत्स्यालय, तारंगण, विज्ञान केंद्र आणि सेंद्रीय वनस्पती प्रकल्प उभारणीचा निर्णय पालिकेने घेतला होता. त्यासाठी पालिका प्रशासनाने कोलशेत भागातील जागेचा आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव तयार केला होता. त्यापाठोपाठ आता या भागात पक्षीपालनगृह उभारणीचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. या प्रकल्पाच्या उभारणीकरिता निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी ठाणे महापालिकेने राज्याच्या नगरविकास विभागाकडे पाठविला होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागाने या प्रकल्पासाठी दहा कोटी रुपयांचा निधी नुकताच मंजुर करून तसा शासन निर्णय काढला आहे.