पुणे : पुण्यातील कोथरूडमधील जयभवानीनगरमध्ये दसऱ्याच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. पोटच्या पोराने बापाची किरकोळ वादातून चाकूने वार करुन खून केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. तानाजी पायगुडे असं मृत व्यक्तीचं नाव असून त्यांचं वय ७२ वर्षांचे होते. तर आरोपीचं नाव सचिन पायगुडे असून तो ३३ वर्षांचा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पायगुडे कुटुंब हे पुण्यातील कोथरुड परिसरातील जयभवानीनगर भागातील चाळीत राहत होते. दसऱ्याच्या दिवशी (२ ऑक्टोबर २०२५) दुपारी साडेबाराच्या सुमारास तानाजी पायगुडे आणि त्यांचा मुलगा आरोपी सचिन हे पोटमाळ्यावर असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. दसरा असल्याने सर्व कुटुंब घरात होते. सचिन त्यावेळी दुपारी टीव्ही पाहत होता. तेव्हा वडिलांनी सचिनला टिव्ही बंद कर आणि माझ्या डोळ्यात औषध टाक, अशी हाक मारली. या कारणावरुन सचिन आणि वडील यांच्यामध्ये तुफान वाद झाला. हा वादा इतका टोकाला गेला की, सचिनने वडिलांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सचिनने वडिलांच्या गळा आणि चेहऱ्यावर हल्ला केला. पोटमाळ्यावरील ही ओरडाओरड ऐकून तानाजी यांची पत्नी सुमन धावत आल्या. त्यांनी पाहिलं की मुलाने वडिलांवर हल्ला केला होता ज्यात तानाजी गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर आरोपी सचिन घरातून पळून गेला. त्यानंतर सुमन यांनी पती गंभीर जखमी अवस्थेत तातडीने रुग्णालयात दाखल केलं. पण त्यांना उपचार मिळण्यापूर्वी मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन सचिनला शोधून त्याला अटक केली.