ठाणे : महाराष्ट्राच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असलेल्या गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित करण्यात आल्यानंतर आता या उत्सवाचा वारसा डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी ‘Bappa.org’ हा अधिकृत डिजिटल मंच सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, श्रद्धा, संस्कृती आणि ऐतिहासिक माहितीचे कायमस्वरूपी डिजिटल दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणेकरांना या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. या मंचावर नागरिकांना आपल्या घरातील किंवा सार्वजनिक गणेश मंडळातील आरतीचे व्हिडिओ, बाप्पाची आकर्षक छायाचित्रे, गणेशोत्सवाशी निगडित आठवणी, अनुभव, पारंपरिक पाककृती तसेच सांस्कृतिक वैशिष्ट्यांची माहिती अपलोड करता येणार आहे. यामुळे प्रत्येक गाव, शहर आणि परिसरातील वैशिष्ट्यपूर्ण गणेशोत्सव परंपरा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे, घरगुती गणेशोत्सव आणि पिढ्यानपिढ्या जपल्या जाणाऱ्या पारंपरिक गणेशोत्सवाची नोंद करण्यात येणार आहे. स्थानिक श्रद्धा, रूढी, प्रथा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्सवाचे विविध पैलू डिजिटल स्वरूपात जतन करून पुढील पिढ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक व्यासपीठ मिळण्यास मदत होणार आहे. “ठाणेकरांनी आपल्या घरातील, गावातील आणि परिसरातील गणेशोत्सवाच्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरा ‘Bappa.org’वर नोंदवून हा सांस्कृतिक ठेवा जगासमोर आणावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून गणेशोत्सवाचा इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक समृद्धी डिजिटल माध्यमातून जतन होऊन भविष्यातील पिढ्यांसाठी एक मौल्यवान सांस्कृतिक दस्तऐवज तयार होणार आहे.

