मुंबई : विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या ‘शाळा बंद’ आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाने दिले असतानाही राज्यभरातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. वेतन कपातीचा इशारा मिळूनही ‘वेतन कापले तरी माघार नाही’ अशी भूमिका घेत अनेक शिक्षक गुरुवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकत्र आले. शिक्षक संघटनांनी या आंदोलनात पाच हजारांहून अधिक शिक्षक सहभागी झाल्याचा दावा केला असला, तरी शालेय शिक्षण विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार राज्यभरातून एकूण ८ हजार ६०० शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले. या सर्वांच्या एक दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई होण्याची शक्यता असून, संबंधित कर्मचाऱ्यांची उपस्थिती आणि रजेची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. आंदोलनात सहभागी होणाऱ्या शिक्षकांची अचूक माहिती संकलित करण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा शिक्षणाधिकारी तसेच मुंबईतील शिक्षण निरीक्षकांना विशेष निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हानिहाय अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला आहे. शालेय शिक्षण विभागाच्या माहितीनुसार राज्यातील एकूण २४ हजार ६९३ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांपैकी २२ हजार ९१० शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू होते, तर १ हजार ४६६ शाळा बंद राहिल्या. राज्यभरातील २ लाख ७२ हजार ९७ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी शाळांमध्ये उपस्थित होते, तर ८० कर्मचारी रजेवर असल्याची नोंद करण्यात आली आहे. शासनाने अनुपस्थित कर्मचाऱ्यांची माहिती तपासून नियमांनुसार आवश्यक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
आंदोलनाचा प्रभाव राज्यातील काही विभागांमध्ये तुलनेने अधिक जाणवला. विशेषतः नागपूर आणि कोल्हापूर विभागात आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. नागपूर विभागातून सर्वाधिक २ हजार ५४६ शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले, तर कोल्हापूर विभागात २ हजार ७३९ जणांनी सहभाग नोंदवला. याशिवाय सोलापूरमधून ९६३, पालघरमधून ६४२, साताऱ्यातून ४४०, वर्ध्यातून ४१३, सांगलीतून २३६, हिंगोलीतून २२०, धाराशिवमधून १९८ आणि अहिल्यानगरमधून ५५ शिक्षक आंदोलनात सहभागी झाल्याची नोंद आहे. दुसरीकडे पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि अमरावती विभागांतील बहुतांश शाळांमध्ये नियमित अध्यापन सुरू राहिल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यात अतिवृष्टीमुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने १९० शाळांना सुट्टी जाहीर केली होती. त्यामुळे त्या भागातील शाळांवरील परिणाम वेगळा असल्याचे नमूद करण्यात आले आहे. काही जिल्ह्यांमध्ये शिक्षकांनी शाळेत नियमित उपस्थित राहून काळ्या फिती लावून आंदोलनाला प्रतीकात्मक पाठिंबा दिल्याची नोंदही करण्यात आली आहे. दरम्यान, आंदोलनात सहभागी झालेल्या शिक्षकांवर वेतन कपातीची कारवाई होण्याची शक्यता असली तरी आपल्या मागण्यांवर ठाम राहून त्यांनी आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

