मुंबई : मुंबईच्या फुटपाथवर संसार मांडून वसलेल्या झोपड्या हटवण्यासाठी हिम्मत आणि इच्छा लागते.तीच गोष्ट मुंबई महापालिकेत नाही, अशा शब्दात उच्च न्यायालयाने मुंबई महपालिकेला खडेबोल सुनावले. पवईतील एका शाळेनं दाखल केलेल्या याचिकेची गंभीर दखल घेत न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे आणि अभय जे. मंत्री यांच्या खंडपीठाने थेट पालिका आयुक्तांनाच दहा दिवसात संबंधित अतिक्रमण हटवण्याबाबतच्या कारवाईचा आराखडा सादर करण्याचे आदेश दिले.
पवईतील ब्युमाँट स्कूलनं यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. येथील पोद्दार मार्ग ते जेव्हीएलआरपर्यंतचा रस्ता आणि पदपथावर झोपड्यांचं अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चाललंय. त्यामुळं येथील रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होत आहे. त्याचा विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना नाहक त्रास होतोय. शाळेकडून महापालिकेकडे याची रितसर तक्रार करण्यात आलीय. मात्र, महापालिका प्रशासन काहीच करत नाही. त्यामुळे याप्रकरणी आता मुंबई उच्च न्यायालयाने झोपड्यांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.

