ठाणे : समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही आजच्या काळातील अत्यंत महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ राम पुनियानी यांनी व्यक्त केले. ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या “लोकशाही भारत – राष्ट्र की सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत आनंदा होवाळ लिखित “लोकशाही भारत – राष्ट्र की सनातनी हिंदुराष्ट्र?” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार (७ मार्च) रोजी सायंकाळी ठाणे येथील मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. इंडियन सोशल मूव्हमेंट या संघटनेच्या १९ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते राजन राजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ अरविंद वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बँकिंग अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी, काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे, अॅड. गाथा ढाले, इंडियन सोशल मूव्हमेंटच्या अध्यक्षा सविताताई सोनवणे, ॲड प्रकाश कदम,दिनेश खोल्लम, उषाताई आनंदा होवाळ,यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना डॉ. पुनियानी यांनी भारताच्या सामाजिक व राजकीय इतिहासाचा आढावा घेतला. भारताची राष्ट्रनिर्मिती ही समानता, लोकशाही आणि सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचे सर्वात मोठे बळ असून त्यातील मूल्यांचे जतन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्वातंत्र्यलढ्यात विविध विचारधारा आणि चळवळी सक्रिय होत्या. समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेक नेत्यांनी संघर्ष केला. विशेषतः बी आर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाने देशाला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूलभूत मूल्ये दिली, असे त्यांनी नमूद केले. सामाजिक परिवर्तनात शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना त्यांनी ज्योतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा उल्लेख केला. मुली आणि वंचित समाजासाठी शिक्षणाची दारे उघडून त्यांनी समाजात समतेचा मार्ग दाखवला, असे ते म्हणाले. इतिहासाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की इंग्रज भारतात व्यापारासाठी आले; परंतु पुढे त्यांनी येथे सत्ता प्रस्थापित करून देशाची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी आधुनिक संस्था उभारण्यावर भर देण्यात आला. त्या संदर्भात जवाहरलाल नेहरू यांनी मोठी धरणे, उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना “आधुनिक भारताची मंदिरे” असे संबोधले होते, असे त्यांनी सांगितले. समाजात धर्माच्या आधारावर विभागणी निर्माण करण्याच्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त करत त्यांनी भारताची खरी ताकद ही विविधतेतील एकता आणि लोकशाही मूल्यांमध्ये असल्याचे अधोरेखित केले. संविधानाबद्दल समाजात व्यापक जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असून नागरिकांना त्यांच्या अधिकार आणि कर्तव्यांची जाणीव झाली तर लोकशाही अधिक मजबूत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी काँग्रेस प्रवक्ते डॉ. विवेक कोरडे यांनी समाजात वाढत चाललेल्या धार्मिक ध्रुवीकरणाच्या पार्श्वभूमीवर संविधानिक मूल्यांचे रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. समाजाला विचार करायला भाग पाडणाऱ्या प्रबोधनपर साहित्याची आजच्या काळात मोठी आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. लेखक आनंदा होवाळ यांच्या अभ्यासपूर्ण लेखनाचे कौतुक करत अशा संवेदनशील विषयांवर लेखन करण्यासाठी मोठा अभ्यास आणि सामाजिक बांधिलकी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. पुस्तकात विविध संदर्भग्रंथांच्या आधारे ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांची मांडणी करण्यात आली असून लेखकाचा कार्यकर्त्याचा अनुभव या लिखाणातून स्पष्टपणे दिसून येतो, असेही त्यांनी नमूद केले. अर्थतज्ज्ञ डॉ. विश्वास उटगी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, समाजातील सामान्य माणसाला असामान्य विचार देण्याचे काम साहित्य आणि वैचारिक लेखनातून होत असते. या पार्श्वभूमीवर प्रकाशित झालेले हे पुस्तक समाजाला दिशा देणारा वैचारिक दस्तऐवज असल्याचे त्यांनी नमूद केले. भारताची खरी ओळख ही लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर आधारित असल्याचे सांगत देश धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही राष्ट्र म्हणून टिकून राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कामगार नेते राजन राजे यांनी आपल्या मनोगतात समाजातील कामगार, कष्टकरी आणि वंचित घटकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. समाजात समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांची जपणूक झाली तरच खरी लोकशाही टिकू शकते, असे ते म्हणाले. कामगार वर्ग हा समाजाचा कणा असून त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून समाजाचा विकास शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पुस्तकाच्या प्रकाशनानंतर लेखक आनंदा होवाळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जगातील अनेक महामानवांनी समता, स्वातंत्र्य आणि मानवी हक्कांसाठी आपले आयुष्य अर्पण केले आहे. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजात संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण करण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. भारतामध्ये सध्या धर्माधारित राष्ट्राच्या संकल्पनेवर चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर लोकशाही, संविधान आणि समानतेच्या मूल्यांवर आधारित भारताची संकल्पना अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात इंडियन सोशल मूव्हमेंटच्या अध्यक्षा सविता सोनावणे यांनी संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत समाजात संविधानिक विचार आणि सामाजिक न्यायाचा प्रसार करण्यासाठी संघटना सातत्याने कार्यरत असल्याचे सांगितले. अॅड. गाथा ढाले यांनी आपल्या मनोगतात सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याला अभिवादन करत आनंदा होवाळ यांनी लिहिलेले हे पुस्तक समाजात विचारांची नवी जागृती घडवेल, असा विश्वास व्यक्त केला. समाजात विचारांची देवाणघेवाण झाली तरच प्रबोधनाची चळवळ पुढे जाईल, असेही त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, लेखक, अभ्यासक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात पुस्तकाच्या आशयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शेवटी वक्त्यांनी समाजात संवाद, बंधुता आणि एकता वाढवण्याचे आवाहन करत लोकशाही आणि संविधानिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली.

