नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला नवी दिशा मिळणार आहे. या विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. आज लोकार्पण झालेली मेट्रो-३ मार्गिका म्हणजे मुंबईकरांसाठी मोठा दिलासा आहे. ‘कुलाबा-बांद्रा-सीप्झ’ हा मार्ग सुरु झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे. मेट्रो लाईन-३ च्या ‘फेज २-बी’च्या उद्घाटनाने मुंबईला नवी गती मिळणार आहे. ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही, तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबरीने वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी व्यकत् केला.
‘मुंबई वन’हे ॲप म्हणजे ‘वन मुंबई, वन ॲप या संकल्पनेची झलक आहे. हे ॲप मुंबईकरांचा प्रवास अधिक सुलभ, सुत्रबध्द आणि स्मार्ट बनविणार असणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर आज सुरु होत असलेले अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांसाठी आशेचे नवे दालन आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अकरा वर्षांत देशाने विकासाची नवी झेप घेतली आहे. ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करत आहोत आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील, असा विश्वास व्यक्त करून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे या राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत. विमानतळ आणि मेट्रोच्या प्रकल्पांमुळे मुंबईकरांच्या जीवनमानात आणि महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रवासाला गती मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.