वृत्तसंस्था : आजपासून सुरु होत आहे सरकारची एक नवीन योजना, ७५ लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारकडून लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना प्रत्येकी १० हजार रुपये दिले जाणार आहेत. ही रक्कम थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा केली जाणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज म्हणजेच २६ सप्टेंबर रोजी ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’चा शुभारंभ करणार आहेत. मोदींच्या हस्ते ७५ लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी १० हजार रुपये पाठवले जाणार आहेत.
केंद्र सरकारच्या या योजनेसाठी एकूण ७५०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या योजनेशीसंबंधित अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे उद्दिष्ट महिलांना ‘आत्मनिर्भर’ (स्वावलंबन) बनवणे आणि स्वयंरोजगार आणि उपजीविकेच्या संधींद्वारे सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्याचं आहे. ही योजना सार्वत्रिक स्वरूपाची आहे. या योजनेअंतर्गत बिहारमधील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला आर्थिक मदत दिली जाणार आहे. या आर्थिक मदतीमुळे महिलांना त्यांच्या आवडीचे रोजगार किंवा उपजीविकेचे उपक्रम सुरू करता येतील, असा विश्वास सरकारला आहे. १० हजार रुपयांचे प्रारंभिक अनुदान दिले जाईल, त्यानंतरच्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंत अतिरिक्त आर्थिक मदत मिळण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ही योजना समुदाय-केंद्रित असेल आणि बचत गटांशी जोडलेल्या व्यक्तींच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींसंदर्भातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासंदर्भातील माहिती अधिकाऱ्यांनीच दिली. बचत गटांच्या उत्पादनांच्या विक्रीला पाठिंबा देण्यासाठी, बिहारमध्ये “ग्रामीण हाट” (ग्रामीण बाजार) विकसित केला जाईल, असंही सांगण्यात आलं आहे.