पुणे : शहरातील टिंबर मार्केट परिसरात मध्यरात्री भीषण आग लागून सुमारे ५० ते ६० लाकडाची दुकाने जळून खाक झाली. जय वल्लभ शाळेजवळ असलेल्या या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड आणि ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. मात्र, ही घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही, ही दिलासादायक बाब ठरली. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे. रात्री २ वाजून ५ मिनिटांनी आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलासह पुणे कॅन्टोन्मेंटचे एक आणि पीएमआरडीएची दोन अशी एकूण २७ अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली. आगीचा वेग लक्षात घेता अग्निशमन दलाने चारही बाजूंनी पाण्याचा मारा सुरू केला. परिसरातील रहिवासी भाग आणि इतर दुकाने सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. आग शेजारील वसाहतीपर्यंत पोहोचू नये, यासाठी जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.
घटनास्थळी सुमारे १० अधिकारी आणि १५० अग्निशमन जवान तैनात करण्यात आले होते. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. त्यानंतरही आग पूर्णपणे विझल्याची खात्री करण्यासाठी कुलिंग ऑपरेशन सुरू ठेवण्यात आले असून, जळालेल्या दुकानांमधून धूर आणि उष्णता कमी करण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, या आगीत ५० ते ६० हून अधिक दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून, शॉर्टसर्किट, विद्युत बिघाड किंवा इतर कोणत्या कारणामुळे आग लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात येत असून, तपासानंतरच आगीमागील कारण आणि नुकसानीचे अचूक स्वरूप स्पष्ट होणार आहे.

