पुणे : पुणेकरांच्या दैनंदिन प्रवासावर परिणाम करणारा महत्त्वाचा निर्णय मेट्रो प्रशासनाने घेतला असून, शहरातील महत्त्वाचा भिडे पूल १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानक आणि पेठ परिसराला जोडणाऱ्या नवीन पादचारी पुलाच्या बांधकामासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, कामाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. मुठा नदीवरील भिडे पुलावरून हा आधुनिक पादचारी पूल उभारण्यात येणार असून, त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर नारायण पेठ, शनिवार पेठ, लक्ष्मी रस्ता आणि आसपासच्या भागातील नागरिकांना तसेच शिक्षणासाठी या परिसरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकापर्यंत थेट, सुरक्षित आणि सुलभ पादचारी मार्ग उपलब्ध होणार आहे. मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मुख्य भिडे पूल वाहतुकीसाठी बंद असला तरी नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला राहणार आहे. त्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीची सोय कायम ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
भिडे पूल बंद राहिल्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे मेट्रो प्रशासनाने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाच्या सूचनेनुसार लकडी पूल, बालगंधर्व पूल आणि झेड ब्रिज हे पर्यायी मार्ग म्हणून वापरण्यात यावेत, असे सांगण्यात आले आहे. पादचारी पुलाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम सुरू असून, या कालावधीत नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. नवीन पादचारी पूल पूर्ण झाल्यानंतर मेट्रो स्थानकापर्यंतचा पायी प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर होणार असून, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेलाही त्याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाने व्यक्त केला आहे.

