नवी दिल्ली : निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी फॉर्म ६ भरताना नवीन मतदारांसाठी महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता प्रथमच मतदार यादीत नाव समाविष्ट करणाऱ्या प्रत्येक अर्जदाराला पालकांचा एसआयआर (Special Intensive Revision) तपशील घोषणापत्रासह सादर करणे बंधनकारक असेल. आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, जून २०२५ मध्ये बिहारमध्ये सुरू झालेल्या एसआयआर मोहिमेदरम्यान ही अट लागू करण्यात आली होती. फॉर्म ६ मध्ये औपचारिक दुरुस्ती करण्यात आलेली नसली, तरी स्वतंत्र सूचनेद्वारे हे घोषणापत्र अनिवार्य करण्यात आले आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत उपस्थित झालेले प्रश्न आयोगाने फेटाळून लावत ही प्रक्रिया पूर्णपणे घटनात्मक, पारदर्शक आणि भेदभावमुक्त असल्याचा दावा केला आहे.
सर्व पात्र भारतीय नागरिकांचा मतदार यादीत समावेश करणे आणि अपात्र नावे वगळणे हा या प्रक्रियेचा उद्देश असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. तसेच, नाव वगळल्यास संबंधितांना त्याविरोधात आक्षेप नोंदविण्याची संधीही उपलब्ध असल्याचे आयोगाने सांगितले. एसआयआर प्रक्रिया तीन टप्प्यांत राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात बिहारमध्ये प्रक्रिया पूर्ण होऊन अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तामिळनाडू, केरळ, गोवा, पुदुचेरी, अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीप येथे एसआयआर राबवण्यात आली. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, ओडिशा, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा, उत्तराखंड तसेच दिल्ली, जम्मू-काश्मीर आणि चंदीगडमध्ये प्रक्रिया सुरू आहे. मतदार याद्यांचे सखोल पुनरावलोकन व अद्ययावतीकरण करून केवळ पात्र आणि अस्सल मतदारांचाच समावेश राहावा हा एसआयआरचा उद्देश आहे. भारतात सुमारे २१ वर्षांनंतर ही प्रक्रिया राबवली जात असून यापूर्वी २००२ ते २००४ दरम्यान देशव्यापी विशेष पुनरीक्षण मोहीम पार पडली होती. आयोगाच्या माहितीनुसार, देशात एसआयआर प्रक्रिया आठव्यांदा राबवली जात आहे. नवीन नियमामुळे मतदारांची ओळख आणि नोंदींची पडताळणी अधिक सुलभ होणार असून अर्जदारांना कमी कागदपत्रे सादर करावी लागतील. तसेच दुबार, मृत, स्थलांतरित आणि परदेशातील मतदारांची नावे ओळखणे सोपे होईल. ऑनलाइन फॉर्म ६ भरणाऱ्या अर्जदारांना आवश्यक घोषणापत्र सादर केल्याशिवाय अर्जाची पुढील प्रक्रिया करता येणार नाही.

